लघुकथा:- पेरणी
चार महिन्यापासून सूर्य सारखा आग ओकत होता. त्याच्या उष्णतेने सगळेच हैराण झाले होते. माणसं, जनावरं, पार होरपळून निघाली होती. झाडं-झुडपं तर सुकून गेली होती त्यांच्यात जणू प्राण उरला नव्हता. यावर्षी खूपच उन्ह तापले, उन्हाळा जरा कडकच गेला. कपाळावरील घाम पुसत प्रभाकर मंदिराच्या वट्यावर बसलेल्या सगळ्या मित्रमंडळींना सांगू लागला.
तेवढ्यात सोपानराव म्हणतात,
“ऊन तापलं तर पाणी ही तसाच पडेल की, जोमाचा”
“उन्हामुळे शेतही तापलं चांगलं यावर्षी आता पाऊस जर दमदार पडला तर यावर्षी पीक पाणी लयभारी जमेल.”
मधेच हरी म्हणतो,
“जमू दे बुवा चांगलं यावर्षी माझ्या पोरीचं लग्न हाय” यावर्षी पीक पाणी चांगलं झालं तर दोन पैसे हाती लागेल. लग्न जोमात करता येईल. पाऊस कमी पडला तर पीक पाणी कायचा जमते मग....! कुठून आणू पैसे पोरीच्या लग्नाला? हरि पार चिडून बोलत होता. पावसाच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. तेवढ्याच गावचे पोलीस पाटील जवळून जात होते. त्यांनी सगळ्यांना हातवर करून राम राम घातला.
“राम राम मंडळी”
“रामराम पाटील काय म्हणता?”
“काय नाही”
“कामानिमित्त तालुक्याला गेलतो.”
“झाले का पाटील काम मग....!”
“कायचं होतं काम हरी....!”
“तालुक्याला पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला.”
“तालुक्याला....!”
“आणि पाऊस.....!”
“हो....! हो....!”
“प्रभाकरराव तालुक्याला खूप धुवाधार पाऊस झाला.”
सगळेजण आश्चर्यचकित होऊन पाटलाकडे बघतच राहिले. प्रभाकरला खूप आनंद झाला. पाटलाचे ते शब्द सारखे कानात घुमत होते. थोड्यावेळांनी मंदिराच्या वट्यावरील गप्पांची मैफिल मोडली. प्रभाकर घरी निघून आला. शेतातील कामे संपली होती. नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचनी करून शेत पेरणीसाठी सज्ज करून ठेवले होते. खत, बी-भरण आणून ठेवले होते. सगळी तयारी जोमात करून ठेवली होती. आता फक्त पावसाची प्रतीक्षा होती. पावसाला सुरुवात झाली होती. आज तालुक्याला पाऊस पडल्याची बातमी पाटलाने सांगून आणखीनच पाऊस जवळ आल्याचे समजले. चातक पक्षांप्रमाणे प्रभाकर रोज पावसाची वाट पाहू लागला. पण पाऊस काही पडेना. शेजार पाजारच्या गावात कुठं मुठं पाऊस पडल्याचे सकाळी पारावर कानी पडू लागले. पण आपलेच गाव कसं काय सुटले या पावसातून....! याची चिंता प्रभाकर करू लागला. एक आठवडा लोटला पण पावसाचा थेंब पडला नाही. सगळं गाव पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहू लागलं. पाऊस पडला नाही तर, पेरणी कशी करावी या चिंतेने प्रभाकर दोन दिवसापासून जेवला नाही. शेतकरी, जमीन व पाऊस यांचं नातं माय लेकरा सारखंच आहे. दुपारी प्रभाकर जेवून सहज विचारात मग्न झाला. पावसाच्या चिंतेत रमलेल्या प्रभाकरला डुलकी लागली. अचानक उन्ह झाकाळून आले. आकाशात ढग जमा झाले. थंडगार हवा सुटली व अचानक पावसाला सुरुवात झाली. प्रभाकर ची पोरं अंगणात खेळत होती. ती धावत पळत घरात आली व मोठमोठ्याने ओरडू लागली.
“बाबा…!”
“ओ बाबा….!”
“पाऊस सुरू झाला.”
“बघा अंगणात किती मोठे मोठे थेंब पडत आहे.”
असे म्हणून पोरं पुन्हा अंगणात जाऊन पावसात खेळू लागली. या वर्षीचा पहिलाच पाऊस होता त्यामुळे लहान मुलं पावसात आनंदाने उड्या मारू लागले. प्रभाकर लेकरांच्या आवाजामुळे जागा झाला. पावसाचे चार थेंब जमिनीवर पडताच जमिनीतून छान सुगंध बाहेर पडत होता. आठ महिन्यापासून तहानलेल्या जमिनीला सुद्धा पावसाच्या आगमनाने आनंद झाला होता. पहिल्या पावसाच्या सरीचा थेंब जमिनीवर पडताच जमिनीतून छान सुगंध बाहेर पडतो. हा सुगंध असाच शेतकऱ्यांच्या जीवनात सुद्धा भरला पाहिजे. त्याच्या कष्टाच्या घामाची, सुगंधाची किंमत समाज, व्यापारी व सरकारला कळली पाहिजे. पावसाच्या आगमनानंतर शेतात होणारी धानाची पेरणी ही खरी तर शेतकऱ्याच्या नशीबाची पेरणी आहे. वर्षभर काबाडकष्ट करा व पावसावर अवलंबून रहा. निसर्गाकडे डोळे करूनच वर्षभर जीव मुठीत धरून काम करा तेव्हा कुठे झोळीत चार पैसे पडतात. या विचारात प्रभाकर गडून गेला. तेवढ्यात त्याची बायको लक्ष्मी मस्त गुळाचा कोरा चहा करून घेऊन त्याच्याजवळ आली.
“चहाची कप बशी पुढे करून हळूच म्हणाली,”
“अहो पडले की चार थेंब पावसाचे....!”
“घ्या बघू चहा....! गोड तोंड करा.”
रूण राजा झाला की प्रसन्न....! झाली आता सुरुवात. बघा आता रोजच कसा धो धो पाऊस पडतो. उगाच तोंड पाडून बसू नका रोजच्या सारखे....!”
“प्रभाकर लक्ष्मी कडे बघुन बोलु लागला.”
“अगं लक्ष्मी दर वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस लांबला. त्यामुळे पेरणी पण लांबली ही काय आनंदाची गोष्ट आहे का? अग वेळेवर पेरणी झाली तरच पुढें पीक पाणी चांगलं येतं....! नाहीतर पिक पाणी लय मार खातं.”
“बरं....! बरं...!”
“मला ठावूक आहे सगळं....!”
“मी काय एखाद्या साहेबांची लेक बाळ आहे. हे समदं मला सांगायला.”
मी शेतकऱ्याचीच पोरं आहे. मला सगळं ठाऊक आहे. गावात फक्त आपलीच पेरणी बाकी असल्यागत तुम्ही चिंता करत बसता. यावर्षी थोडा पाऊस लांबला त्यामुळं सगळ्यांचीच पेरणी लांबली. बिचारा पाऊस तरी काय करेल. लवकर आला तरी लोक नाव ठेवतात. व उशीर झाला तरी लोक नाव ठेवतात. तो बिचारा....! तरी काय करेल. प्रभाकर व लक्ष्मीच्या गोड बोलण्यांत बाहेर तोपर्यंत छान पाऊस पडला होता. प्रभाकर बाहेर येऊन पाहतो तर अंगणात पाणी साचले होते. पोरं पावसात ओली चिंब झाली होती. पावसाच्या थेंबा बरोबर उड्या मारत मारत पोरं नाचत होती. प्रभाकरने पोरांना ओरडून घरात बोलावून घेतले. अरे किती वेळ पावसात उड्या मारता. चला आता कपडे बदलून घ्या. जास्त वेळ ओले राहिलात तर ताप, सर्दी, होईल. परत दवाखान्यात पळावे लागेल.
“अहो बाबा काय होत नाही.”
“किती दिवसांनी पाऊस पडला आज....!”
“किती छान मज्जा येत होती.”
“थंडेगार पावसाचे थेंब पडत होते. नुसते उभे राहिले तरी पाऊस भिजून टाकतो लगेच.”
“प्रभाकरची छोटी मुलगी मुक्ताई बोलत होती.”
लहान लेकरांना पेरणी, शेती हे काही कळत नाही. त्यांना फक्त पाहिजे असतो स्वतःचा आनंद. बाप आठ दिवसापासून पोटभर जेवला नाही की, शांत झोपला नाही. या पावसाच्या चिंतेने बापाची झोप उडाली होती. व तुम्हाला मस्ती सुचत आहे. चला लवकर कपडे बदला. लक्ष्मी लेकरावर चिडून बोलत होती. उद्या पासून आम्हाला शेतावर जावे लागेल. आता पेरणी, लागवड करावी लागणार तेव्हा, तुम्हांला घरी राहावे लागणार. “तुम्ही मंग दिवसभर असाच धिंगाणा घालणार आहे का?” मधेच मुक्ताई ची गडबड सुरू झाली.
“आई....! आई....! मी पण येणार शेतात.”
“मी दिवसभर शेतात थांबणार तुझ्या सोबत....!”
“अग आम्हाला शेतात काम करावे लागणार. आम्ही बसायला चाललो नाही शेतात....! तू येऊन काय करशील तिथे?”
“दादा आणि मी झोका खेळत बसेल झाडाखाली.”
“बरं...! बरं....! बघू उद्याच्या उद्या.”
“आता शांत बसा घरात. कुणीही बाहेर जायचे नाही.”
पाऊस पडून एक घंटा झाला नव्हता तोच लक्ष्मीची उद्याच्या पेरणीची तयारी सुरू झाली होती. बी-भरण, खत पेरायला फिरायला ओटीसाठी साडीचा कपडा, खुरपे, कुऱ्हाड असे साहित्य एका कोपऱ्यात ठेवायला सुरुवात केली. प्रभाकर उद्याच्या पेरणीसाठी हरीच्या घराकडे आला होता. हरीकडे दोन बैल होते. त्याचे दोन बैल व स्वतःचे दोन बैल अशी सावड करून पेरणी करता येईल. दोन दिवसात आपली पेरणी होईल. आपले झाले की, त्याची पेरणी करता येईल. सावड केली की एकमेकांना मदत होते व पेरणीही लवकर आटोपते. लक्ष्मीला खत पेरायला त्याच्या बायकोची मदत होईल. दोघीजणी मागे लगेच खत पेरतील. अशा विचारात प्रभाकर हरीच्या घरी आला. दारातूनच प्रभाकरने आवाज दिला.
“वहिनी....! ओ वहिनी....! हरी आहे का घरी?”
“तेवढ्यात हरीने घरातून प्रभाकर चा आवाज ऐकला.”
“अरे ये प्रभाकर....! घरीच आहे. कुठे जाणार आहे अशा वेळेस....!”
“नाही म्हटलं....! काही खत, बी-भरण घ्यायला तालुक्याला गेला की काय लगेच.”
तालुक्याला जायचे काम नाही ठेवले. सगळं खत, बी-भरण, लागवडीचं बियाणं एकदाच आणुक टाकलं. पावसाचा मात्र पत्ता नव्हता.
अरे माझे पण तसेच झाले की यावर्षी....! मला तर वाटलं यावर्षी बिचारा पडतोच की नाही. की देतो सुट्टी एवढ्या वर्षी.
हरी हसत हसत म्हणाला,
“असं नको बोलू बापा....!”
मला यावर्षी त्याची लय गरज आहे. एवढ्या वर्षी त्यांन साथ दिली ना....! तर छकीचे लग्न धुमधडाक्यात लावतो. मग मला कुण्या पाहुण्याकडे हात पसरायची वेळ येणार नाही.
मलाही तेच वाटते. यावर्षी पीक पाणी चांगलं झालं तर घराचे काम करावे. पावसाळ्यात लय गळतं बघ घर....! भिंत पण लयच पडायला आली. मातीच्या भिंती आहे त्या आजोबांच्या हातच्या. किती दिवस टिकतील तरी....! तिसरी पिढी आहे माझी त्या घरात....! त्याला तरी काय म्हणावे, लय साथ दिली या घराने मला आतापर्यंत....!
मला तर आता दोन-चार वर्षे घर बांधण्याचा विचार पण करता येत नाही. दोन्ही पोरीचे एकदा व्यवस्थित लग्न पार पडले की, मी मग घर बांधायला मोकळा होतो.
“हरी एवढी चिंता करू नको.”
“होईल की छकीचे लग्न धुमधडाक्यात.”
“लय अडचण आली तर मी मदत करील तुला....! काय चिंता करू नको. छकीचे लग्न आधी, मग माझे घर. बस मग तर झालं....!”
“हरी एकदम भावूक झाला होता.”
परिस्थिती समोर प्रत्येकालाच हतबल व्हावे लागते. परिस्थितीपुढे कुणाचेही काही चालत नाही. हरीच्या बायकोने चहा करून आणला.
“भाऊजी हा घ्या चहा.”
“वहिनी चहा कशाला बनवला. मी चहा घेऊनच आलो होतो इकडे.”
“अहो भाऊजी घ्या चहा. हे काय लोकाचे घर आहे का? हे ही तुमचेच घर आहे.”
“हो....! हो....! ते तर आहे.”
“मी तरी कुठे परकं समजतो. माझेच घर आहे.”
चहा घेत घेत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळानंतर हळूच प्रभाकरने विषय काढला.
बरं मी काय म्हणतो हरी, “उद्या माझी पेरणी करू आधी” मग दोन दिवसांनी तुझी पेरणी करूया. माझी शेती जरा दूर आहे व त्याला रस्ता नाही. शेजारची पेरणी होण्याअगोदर पेरणी झाली की चिंता मिटते बघ. नाहीतर दोन दिवस उशीरही झाला असता तरी काही हरकत नव्हती. तुझे शेत रस्त्याच्या कडेला आहे त्यामुळे तुला कधीही पेरता येते.
“कधीही नाही प्रभाकर….! वेळेवरच पेरावे लागेल.”
“तुझी पेरणी झाली की दोन दिवसांनी लगेच माझी पेरणी करून घेऊ. मग कुण्याच्या ही शेतात जायला आपण मोकळे होतो.”
“हो ते आहे म्हणा.”
“दोन चार दिवस बाहेर पेरायला गेलो तर तेवढे चार पैसे फवारणीला कामी येईल.”
“ते तर आहेच मग....!”
बघू पावसाने साथ दिली तर जाता येईल. नाहीतर हा बिचारा लागून राहिला तर आपलीच पेरणी लांबेल. मग काय दुसरीकडे जायचा मेळ बसतो.
“ते आहे म्हणा, बघू पुढच्या पुढे.”
“असे म्हणून प्रभाकर हरीच्या घरून निघाला.”
“बरं वहिनी सकाळी लवकर आवरा.”
“हो....! भाऊजी सकाळी लवकर आवरून ठेवते. लक्ष्मी ताईला पण लवकर आवरायला सांगा.”
“हो....! वहिनी”
“तीला ही लवकर आवरायला सांगतो.”
असे म्हणून प्रभाकर घरी निघून आला. प्रभाकर घरी परत येताच लक्ष्मीने विचारायला सुरुवात केली.
“काय म्हणाले हरी भाऊजी? उद्या येताय ना आपल्या शेतात....!’”
येतोय म्हणाला,
पण त्यालाही त्याच्या पेरणीची चिंता वाटत होती. पाऊस जास्त पडला तर पेरणी लांबेल याची चिंता वाटते. पावसाने साथ दिली तर सगळं बरोबर होईल बग लक्ष्मी....! उद्यासाठी काय काय घ्यावे लागेल त्या सर्व वस्तू आठवणीने सोबत घे आणि हो पूजेचे सामान घ्यायला विसरु नको. पेरणीला सुरुवात करायच्या अगोदर पूजा करावी लागेल. आपल्या शेतातील मुंजा ची पूजा करावी लागेल. देवाची मान मान्यता केली म्हणजे वर्षभर काही विघ्न येणार नाही. लक्ष्मी लगबगीने सर्व तयारी करत होती. नावाप्रमाणेच प्रभाकरच्या आयुष्यातील ती खरी लक्ष्मी होती. ती मेहनतीने व काटकसरीने संसार फुलवत होती. उद्या पेरणी होणार या विचाराने आज प्रभाकर प्रसन्न होता. दुपारी पडलेल्या पावसाने जनु गावात प्राण आला होता. गावातील सगळी मंडळी दुपारपासून पेरणीच्या तयारीला लागली होती. खत, बी-भरण, औत फाटा, बैलजोडी या सगळ्या वस्तूंची जमा जमव सुरु झाली होती. रात्र झाली अंधार पडला होता. लक्ष्मीने स्वयंपाक करून ठेवला होता. प्रभाकर लेकरांना घेऊन जेवायला बसला. जेवता जेवता मुक्ताई मध्येच म्हणाली, “बाबा उद्या आम्ही शेतात येणार बरं का?”
अरे तुम्ही शेतात येऊन काय करणार. अचानक पाऊस आला तर किती फजिती होईल त्यापेक्षा घरीच खेळा.
बाबा आम्ही झाडाखाली चुपचाप खेळत बसु. तुम्हाला त्रास देणार नाही. येऊ द्या ना आम्हाला शेतात....!
प्रभाकर लेकरांकडे बघून म्हणाला, “अरे आधी पोटभर जेवण तर करा, की आत्ताच जाता शेतात पेरणी करायला.” सगळे खळखळून हसू लागले. उद्या तुम्ही पण चला शेतात पेरणी करायला. बस आता जेव्हा पटकन आणि झोपी जा सकाळी लवकर उठावे लागेल. मुलांनी पटापटा जेवण करून घेतले व झोपी गेली. प्रभाकरने आज समाधानाने जेवण झाल्याबरोबर अंग टाकले. या वर्षीच्या पावसाने खूप प्रतीक्षा करायला लावली. या पावसाच्या चिंतेने सगळ्यांची झोप उडाली होती. आज मात्र पावसाच्या आगमनाने गाव कसं शांत निपचित पडलं होतं.
सकाळ झाली गावात सगळीकडे पेरणीसाठी लगबग सुरू होती. आज गाव सकाळीच जागं झालं होतं. लक्ष्मीने लवकर उठून सडा, रांगोळी केली. सकाळ, दुपारचा स्वयंपाक करून घेतला. आधीच घाई त्यात लेकरं सकाळीच उठून बसली. अहो मी काय म्हणते,
“लेकरांच कस करता त्यांना घ्यायचे का शेतावर”
“घेऊन टाक सकाळी सकाळी त्यांचे रडगाणे नको.”
खेळतील झाडाखाली दिवसभर. तसेही पोरं घरी असले की, पाण्या पावसाचा जीव लागेल. त्यापेक्षा सोबत असली तर आपण तरी बीन फिकीर होऊ.
“हो…! ते पण बरोबर आहे म्हणा….!”
“बरं करते मग त्यांची तयारी....!”
लक्ष्मीने पोरांना अंघोळ घातली. चहा दुध दिले. चुपचाप एका ठिकाणी बसायला सांगितले. पोरं पायात चप्पल बुट घालून अंगणात बैलगाडीची वाट पाहत बसले. प्रभाकर बैलजोडी जुपुन आणायला गेला होता. लेकरं घराच्या आत बाहेर करत होती. तेवढ्यात मुक्ताई उड्या मारतच ओरडू लागली. गाडी आली....! गाडी आली....! प्रभाकर बैल गाडी घेऊन दारात आला. घरातील खताची पोती, बी-भरण, गाडीत टाकले. लेकरं ही गाडीत जाऊन बसले. लक्ष्मीने घर लावून डोक्यावर टोपले घेऊन शेताकडे निघाली. गावाच्या बाहेर पडताच हरी सुद्धा त्याची बैलगाडी घेऊन प्रभाकरच्या शेताकडे निघालेला दिसला. दोघांनी एकमेकांना राम राम घातला. एकामागे एक बैलगाड्या शेतात निघाल्या. कालच्या दुपारच्या पावसाने ओलेचिंब झालेले शेत पेरणीसाठी सज्ज होते. बैलगाडीची चाके चिखल उडवीत होती. पोरांना आज बऱ्याच दिवसानंतर घराबाहेर पडायला मिळाले होते. त्यामुळे पोरं आज खूप खुश होती. गाडीत बसल्या बसल्या दोघांचा गोंधळ सुरूच होता. सूर्यदेव नुकतेच स्वतःचा प्रकाश सगळीकडे पसरवत होते. आज सूर्याच्या आगमना बरोबर सर्व शेतकरी शेतात येत होते. रमत गमत बैलजोड्या शेतात पोहचल्या. प्रभाकरने शेताच्या बांधावर गाडी सोडली. शेताच्या मधोमध आंब्याचे झाड होते. लक्ष्मी पोरांना घेऊन झाडाखाली जाऊन बसली. हरी व प्रभाकरने औत जुपले. बैलाची व औताची पूजा केली. प्रभाकर शेतातल्या मुंजाला नारळ फोडून आला. लक्ष्मीने प्रभाकर व हरीला कुंकू लावले. शेवटी पेरणीचा श्रीगणेशा झाला. पेरणीचे पहिले तास काढले.
दुपारपर्यंत अर्धे शेत पेरुण झाले होते. दुपारी औत सोडुन बैलांना चरायला सोडले. सगळ्यांनी पोटभर जेवणं केली. आभाळ झाकाळून आले होते. आजही पाऊस पडणार असे वाटत होते. पोरांनी झाडाखाली मातीचे खोपे बनविले होते. पळसाच्या झाडाच्या पानासोबत खेळत खेळत लेकरं पण थकली होती. दुपारी जेवणे आटोपल्यावर पुन्हा पेरणीला सुरुवात झाली. दिवस मावळेपर्यंत जास्तीत जास्त रान झाले पाहिजे यासाठी प्रभाकर गडबड करत होता. प्रभाकर ओडीने बैलांना हाकत होता. हरीच्या घरचे व लक्ष्मी मागे खत पेरत होत्या. सूर्यदेवाने दिवसभराची भ्रमंती करुन तो मावळतीला चालला होता. आजच्या दिवसाची पेरणी थांबवुन सगळे घरी निघुन आले.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच पेरणीला सुरुवात झाली. आज उत्साहाने पेरणी सुरु होती. आजुबाजूच्या सर्व राळात पेरणी सुरू होती. अरे राजा हो....! सरजा हो....! आरोळी ठोकून प्रभाकर औत हाकत होता. थोडा थोडा अंधार पडताच पेरणी आटोपली. हरी व प्रभाकरने औत सोडले व बैलगाडी घेऊन घराकडे आले. कालच्या पेक्षा आज दिवसभर शेतात काम करून सगळेच थकले होते. लक्ष्मीने कोरा चहा बनवला. चहा पित पित प्रभाकर लक्ष्मीला म्हणतो, “आज गडबड केली नसती तर थोडे रान उरले असते.” तेवढ्यासाठी परत उद्या जाता आले नसते.
“हो ते पण आहे म्हणा....!”
उद्या हरी भाऊजींची सुखरूप पेरणी झाली म्हणजे आपण यावर्षीच्या प्रेरणेतून मुक्त झालो. लक्ष्मीने घाईघाईने स्वयंपाक केला. पोरं शेतात दिवसभर खेळुन पार थकली होती. मुक्ताई उपाशी पोटीच झोपी चालली होती. प्रभाकर लेकरांना घेऊन जेवायला बसला. दोन घास मुखात जात नाही तोच पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी सुरू होताच प्रभाकरच्या तोंडातला घास साखरेहुन गोड झाला होता. दिवसभर केलेल्या पेरणीवर पडलेल्या पावसाच्या चार थेंबांने का होईना जमिनीत पडलेला दाना दोन दिवसात अकुंर घेऊन बाहेर पडणार. पावसाच्या खुशीत प्रभाकर देवाकडे हात जोडून म्हणतो, “पावलास रे बाबा” एवढ्या वर्षी अशीच कृपा राहूदे.
✍✍✍✍
© राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment