Wednesday, 29 July 2020

शिक्षण क्षेत्रात मूल्यवर्धन कार्यक्रम ठरतोय प्रेरणादायी !

    शिक्षण क्षेत्रात मूल्यवर्धन        कार्यक्रम ठरतोय प्रेरणादायी ! 

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील स्वातंत्र्य,न्याय,समता,बंधुता मूल्य रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे. सामाजिक क्षेत्रात तिन दशकाहून अधिक वर्ष कार्यरत असलेल्या श्री शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धन चे बीज रोवले आहे.या बीजापासून छोटेसे रोपटे तयार झाले.आज हळूहळू हेच रोपटे एका महाकाय वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांनी सुरुवातीला सन 2009-10 या शैक्षणिक वर्षांत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 159 मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला.सन 2009-10 या वर्षात हा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये काही बदल दिसून आले.येणाऱ्या शैक्षणिक वर्षात 2010-11 मध्ये शिक्षक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमामध्ये दिसून येऊ लागला.शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमाविषयी उत्सुकता दिसून येऊ लागली.त्यामुळे बीड जिल्ह्यातील पाटोदा व त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील एकूण 500 शाळा व 38000 विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली.वर्ष 2011-12 मध्ये इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ञांकडून बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा व आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यात आली.काही निवडक शाळेत जाऊन शिक्षक,विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला. शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयीचे मत जाणून घेण्यात आले.वर्ष 2012-13 मध्ये शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमाचे संस्थेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आले.केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ञांकडून आणि एनसीईआरटी तील तज्ञांकडून करण्यात आलेल्या परीक्षणातून असे दिसून आले की,मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांत सकारात्मक बदल दिसून आले. याउलट मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी नसणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सहभागी असणार्‍या विद्यार्थ्यात सकारात्मक बदल दिसून आले.यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे अनुभव व प्रचलित शैक्षणिक धोरणे तसेच एनसीईआरटी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त धोरणे यांच्या अनुषंगाने मूल्यवर्धन कार्यक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आली.सन 2014-15 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ अधिकारी,शिक्षण विभागातील अधिकारी यांनी आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांन मध्ये झालेले बदल लक्षात आले.यामध्ये विद्यार्थ्यांन सोबत संवाद साधण्यात आला.विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी विचारण्यात आले.विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन या कार्यक्रमाविषयी काय वाटते हे जाणून घेण्यात आले.यातून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचार,मते दिसून आली.यानंतर मूल्यवर्धन कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासनाकडून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्यातील राबवलेला हा मूल्यवर्धन कार्यक्रम कायमस्वरूपी स्वीकारण्यात आला.यामध्ये शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद यांच्यामध्ये करार झाला.सन 2015 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला.2016-17 मध्ये महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमध्ये,35तालुके,63केंद्र,724 शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.शांतीलाल मुथ्था फाउंडेशन मार्फत निरनिराळया टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.मूल्यवर्धन कार्यक्रम शिक्षकांना कळावा,मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू, उद्देश हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवातीला तालुक्यातील प्रत्येक केंद्रातुन एका शिक्षकाला प्रेरक म्हणून नेमण्यात आले.तालुक्यातील सर्व केंद्राच्या प्रेरकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर या प्रेरकामार्फत केंद्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले.राज्यघटनेतील मुल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावित आणि हीच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे.या उद्देशाने शाळासाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी आणी उर्दू भाषेमध्ये हा कार्यक्रम उपलब्ध केला आहे.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनसाठी हा कार्यक्रम असुन यामध्ये शिक्षक उपक्रम पुस्तीका व विद्यार्थी उपक्रम पुस्तीका तयार करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विद्या प्राधिकरण मार्फत या पुस्तिका शाळेवर पुरविण्यात येतात.मूल्यवर्धन उपक्रम कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे आपल्या वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे.यासाठी या पुस्तीका मार्गदर्शक ठरतात.तसेच घेतलेल्या उपक्रमावर आधारित कृती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उपक्रम पुस्तिका सोडवुन सराव घेतला जातो.शिक्षक उपक्रम पुस्तिकेमध्ये पाच विभाग करण्यात आलेले आहेत.मी आणि माझी क्षमता,माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेसंबंध,मी आणि आपले जग,सहयोगी खेळ असे पाच विभाग आहेत.प्रत्येक विभागात अभ्यासक्रमाशी निगडीत,सुसंगत असे उपक्रम दिलेलेआहेत.हे उपक्रम इयत्ता निहाय शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्यात किमान तीन तासिका घेऊन हे उपक्रम घ्यायचे आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून स्वतः उपक्रमांमध्ये भाग घेऊन या पुस्तिकेतील उपक्रम विद्यार्थी स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात.गेल्या चार वर्षापासून हा मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आजच्या घडीला मूल्यवर्धन कार्यक्रम हा महाराष्ट्रातील 36 जिल्हे,405 तालुके,5487 केंद्र, 67000 शाळा,3784000 विद्यार्थी,192000 शिक्षक यात सहभागी आहेत.यामुळे शाळास्तरावर विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के आढळून येत आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण होत आहे.शाळा व शिक्षक यामध्ये मैत्रीपूर्ण नाते संबंध प्रस्थापित होताना दिसत आहे.शाळेची पटसंख्या टिकुन ठेवण्यात मदत होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पटसंख्या वाढतांना दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाल्यांनी शिकावे असा निश्चय पालक करत आहे.विद्यार्थी एकमेकांशी सुसंवाद,गटचर्चा करतात. वाडी,वस्ती, तांडा,गाव याठिकाणी जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून नकळत मूल्य रुजत आहे.विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहे. घटनेतील मुल्ये लादण्याची गोष्ट नाही.तर ती नकळत अंगीकारायची गरज आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात बालवयापासून स्वातंत्र,न्याय,समता,बंधुता ही मुल्ये रुजतांना दिसत आहे.विद्यार्थी अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून, अनुभवातून मुल्य अंगीकारत आहे. अशाप्रकारे आनंददायी शिक्षण प्रक्रियेत मुल्ये रुजत राहिली तर, आजचे विद्यार्थी उद्याचे भारत देशाचे उत्तम नागरिक म्हणून समोर येतील. भारतीय राज्य घटनेचा व भारतीय लोकशाहीचा आनंदाने,आदराने स्वीकार करतील.यातून भारतीय राज्यघटना व लोकशाही अधिक मजबूत व बळकट राहील.यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा निश्चितच सिंहाचा वाटा राहील.आज मात्र समाज,शाळा,शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम प्रेरणादायी ठरतोय.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

लेक वाचवा लेक शिकवा

         लेक वाचवा लेक शिकवा

        

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आपण नेहमी वाचतो. प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आई होय. जिचे प्रेम आणि ममत्व याचे ऋण कधीच फेडणे शक्य नाही. नऊ महिने नऊ दिवस बाळाला पोटात सांभाळून, अनेक असह्य वेदना सहन करुन आई बाळाला जन्माला घालते. बाळ आणि आई हे जगातील सर्वात मोठे सुंदर नाते आहे. पण हीच आई कोणाची तरी अगोदर मुलगी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आई सारख्या अनेक भूमिका स्त्रीला निभवाव्या लागतात. मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर अनेक भुमिकेतुन तिला जावे लागते. लक्ष्मीच्या पावलाने मुलगी म्हणून तिचे आगमन होते. आणी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून ती जात असते. प्रत्येक वडिलाचा अभिमान, गर्व, जोपासणारी ती लाडकी लेक होते. जिवापाड प्रेम करणारी लाडक्या भावाची बहीण ती होते. संसाराचा रथगाडा सांभाळून ती उत्तम पत्नी होते. वासल्य, ममत्व, जपणारी आई ती होते. थरथरणाऱ्या हातांनी कोवळ्या गालावरचा मुका घेणारी आजी ती होते. संस्कार आणि संस्कृती जोपासणारी समाजातील ती उत्तम स्त्री होते. अशा लेक, बहिण, पत्नी, आई, आजी, मावशी, काकू, आत्या, मामी अशा अनेक भूमिका स्त्रीला तिच्या आयुष्यात निभवाव्या लागतात. अर्थात प्रत्येक स्त्री या सर्व भूमिका उत्तमच निभावते. संस्कार आणि संस्कृती जोपासत प्रत्येक स्त्री या सर्व भूमिकेतून स्वतःला सिध्द करत असते. भारत एकविसाव्या शतकात महासत्तेकडे वाटचाल करताना येणाऱ्या काळात स्त्रीच्या या भूमिका संपुष्टात येतात की काय? ही भीती वाटू लागली आहे. याचे कारण म्हणजे स्वतःला सुशिक्षित, उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात, कुटुंबात भ्रूणहत्या होत आहे. वंशाला दिवा पाहिजे, वंशाला वारसदार पाहिजे. या हट्टापायी भ्रूणहत्या सारखे महापाप घडत आहे. मुलगी जन्माला येण्या अगोदरच तिचे गर्भातच आयुष्य संपवले जात आहे. मुलगा हा म्हातारपणाची काठी, आधार समजला जातो. या समजुतीने मुलगी जन्माला येण्या अगोदरच लाखो रुपये खर्च करून मुलगा की मुलगी असे गर्भनिदान केले जाते. मुलगी सांगितली तर गर्भातच तिची हत्या केली जाते. या सर्व गोष्टी कायद्याने बंद आहे. लिंगनिदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्या डॉक्टर व संबंधित जोडप्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते. हे माहित असताना सुद्धा अनेक ठिकाणी चोरीछुपे या गोष्टी घडतात. कुठेतरी हे महापाप थांबले पाहिजे. या सर्वावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजात, खेड्या-पाड्यात, वाडी वस्तीवर याची जागृती केली जात आहे. लेक वाचवा हे सांगण्यामागे खूप महत्त्व आहे. कारण लेक जन्माला आली तरच ती अनेक भुमिका निभाऊ शकेल. ‘‘ मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ’’ असे आपण नेहमी ऐकतो, अनेक ठिकाणी वाचतो. जन्मानंतर वडिलांच्या घरी संस्कृतीचा व लग्नानंतर नवऱ्याच्या घरी संस्काराचा प्रकाश पाडणारी ती मुलगीच असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. लेक जन्माला आली नसती तर कदाचित तुम्ही आम्ही जन्माला आलो नसतो. कारण हे सुंदर जग आपल्याला ज्या आईमुळे बघायला मिळाले. ती आई कुणाची तरी लेक होती हा विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे. आजच्या सुशिक्षित समाजाने मुलगा-मुलगी हा भेद केला नाही पाहिजे. आज आपण पाहतो देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात मुलींनी, स्त्रीयांनी स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे. देशाचे प्रत्येक महत्त्वाचे पद महिलांनी भूषविलेले आहे. भारत देशाचे सर्वात मोठे पद राष्ट्रपती हे एका महिलेने भूषविलेले आहे. प्रतिभाताई पाटील या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत. स्वर्गीय इंदिरा गांधींनी भारत देशाचे पंतप्रधान म्हणून पद भूषविलेले आहे. भारत या देशाला अनेक महिलांची यशोगाथा लाभलेली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार-या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यासुद्धा अगोदर सिंदखेड राजा च्या जाधव घराण्याच्या लेक होत्या. जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, कल्पना चावला, पी.टी.उषा, लता मंगेशकर, मेरी कोम, सायना नेहवाल यासारख्या महिला मुलगी म्हणूनच जन्माला आल्या. त्यांच्या वडिलांनी जर आजच्या सारखा संकुचित विचार केला असता, तर आपला देश अनेक महत्त्वांच्या या स्त्रीरत्नांना मुकला असता. आणि म्हणून आज लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाला स्वीकारण्याची गरज आहे. मुलींना आनंदाने जन्माला घालूया. तिच्या जन्माचा आनंदाने स्वीकार करूया. हा विचार या महाराष्ट्राला या देशाला शोभणारा आहे. लेक फक्त जन्माला घालून चालणार नाही. तर तिचे उत्तम संगोपण आणि सरंक्षण करणे गरजेचे आहे. तिला चांगले उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. तिच्या आवडीनुसार तिला करिअर करू दिले पाहिजे. हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येक पालकांनी अभिमानाने स्वीकारले पाहिजे. ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत. यामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, वाडी-वस्तीवर गावात उच्च शिक्षणाची सुविधा नसणे, अनेक समाजामध्ये मुलींना उच्च शिक्षणास बंदी, लवकर लग्न करणे, अशा अनेक समस्या आहेत. परंतु या सर्व गोष्टीवर मात करून मुलींना शिक्षण देणे काळाची गरज आहे. पालक म्हणून ते कर्तव्य आहे. म्हणून मुलींना उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उंच भरारी घेण्यासाठी आपण पालक म्हणून शुभेच्छा देऊया. कारण मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणीप्रमाणे हा प्रकाश असाच अंखडपणे पडत राहो. यासाठी संकल्प करुया लेक वाचवा लेक शिकवा.


‘‘ मुलींना द्या शिक्षणाचा आधार,  करतील अनेक पिढ्यांचा उद्धार. ’’

‘‘ स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी. ’’

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
रा.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852

आज-काल पालकांच्या मुलांनकडून वाढलेल्या अपेक्षा !

        आजकालच्या पालकांच्या      मुलांनकडून अपेक्षा !


महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अठराशे च्या दशकात शिक्षणाचे छोटेशे रोप लावले. आज त्याचा शिक्षणरुपी मोठा वटवृक्ष तयार झाला. आज तुम्हा-आम्हाला सर्वांना या वटवृक्षाने स्वतःच्या ज्ञानरुपी सावलीत सामावून घेतले. एकेकाळी स्त्रियांनी चूल आणि मूल या मध्ये अडकून राहण्याची परंपरा होती. शिक्षणाचे नाव घेणे पाप समजले जायचे. याकाळी शिक्षणाला समाजाचा तीव्र विरोध होता. हा विरोध पत्करून फुले दांपत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ज्ञानरुपी शिक्षणाचा दिवा पेटवला. आज लख्ख प्रकाशात शिक्षणाच्या प्रवाहात घराघरात, समाजात, प्रचंड बदल झाले. शिक्षण गतिमान झाले व काळानुरूप बदललेली शिक्षण पद्धती स्वीकारण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतोय. शाळा, शिकवणी, अभ्यासीका असे वेगवेगळे पर्याय निवडून विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत पालकांच्या आपल्या पाल्याकडून प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, वकील व्हावे, पोलीस व्हावे, कलेक्टर व्हावे, तहसीलदार व्हावे वेगवेगळ्या उच्चपदस्थ पदी त्यांनी गवसणी घालावी. सरकारी नोकरच व्हावे. या हट्टापायी मुलांनवर स्वतःच्या अपेक्षा लादल्या जात आहे. अर्थात आपल्या पाल्याला कशात आवड आहे. त्याच्या जन्मापासूनचा कल, आवड कशात आहे हे जाणून घ्यायला कोणीच तयार नाही. त्यांच्यावर पालकांच्या अपेक्षांचे ओझे खुप आहे. हे अपेक्षांचे ओझे घेऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मालक व्हावे असे कुणालाच वाटत नाही. उलट मुलांनी नोकर व्हावे यासाठी सर्वांचा अट्टाहास सुरू आहे. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम एका ठिकाणी असे म्हणतात. जोपर्यंत या देशात नोकर होण्याचे स्वप्न पाहणे बंद होत नाही तोपर्यंत देशात मालक जन्माला येणार नाही. याचा अर्थ व्यवसाय, उद्योगधंदे, शेती, अभिनय, खेळ, कला यासारख्या क्षेत्रात कुणालाच रस राहिलेला नाही. विद्यार्थी वेगवेगळ्या कलेमध्ये निपुण असतात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात आवड असते. कुणाला गायनाची, कुणाला वादनाची, कुणाला खेळाची, कुणाला चित्र काढण्याची, कुणाला भाषण करण्याची, कुणाला लेखन करण्याची, कुणाला अभिनयाची अशा वेगवेगळ्या कलेमध्ये विद्यार्थ्यांना रस असतो. पालकांनी त्यांच्या कलेनुसार जर शिक्षणाला प्रोत्साहन दिले तर विद्यार्थी जीवनात खऱ्या अर्थाने यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही. जर प्रत्येकच पालकांनी स्वतःच्या अपेक्षा मुलांनवर लादल्या असत्या तर या देशात सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, पी.टी.उषा, कल्पना चावला, अमिताभ बच्चन यासारखी विविध क्षेत्रात यश संपादन करणारी मंडळी तयार झाली नसती. म्हणून पालकांनी मुलांकडून आपल्या वाढत्या अपेक्षा ठेवू नये. आजकाल पालक मुलांना समजून घ्यायला तयार नाही. मुलांना गुणांच्या स्पर्धेत ढकलून पहिला नंबर कसा येईल, शंभर पैकी शंभर टक्के मार्क कसे मिळतील. इतरांपेक्षा माझा मुलगा गुणानुक्रमे पहीला कसा येईल यासाठी पालक सतत विद्यार्थ्यांच्या मागे लागलेले असतात. उच्च शिक्षणासाठी इतरांपेक्षा सर्वप्रथम आपल्याच पाल्याचा नंबर कसा लागेल यासाठी सतत पाठपुरावा करत असतात. उलट आपल्या मुलांना आपण समजून घ्यायला तयार नाही. त्याला अभ्यासक्रम कसा वाटतो, त्याला शाळेत शिकलेले कितपत समजते, तो अभ्यासक्रमाला कशाप्रकारे पेलु शकतो. यासाठी त्याची शारीरिक क्षमता कितपत योग्य आहे. त्याची मानसिक क्षमता कशी आहे. याचा आपण विचार करत नाही. मुलांना आपण मानसिक बळ द्यायला हवेत. त्याला वेळोवेळी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आजच्या तरुण मुलांचे बालपण हिरावून घेतल्या जात आहे. लहानपणापासुन खेळणे, बागडणे, गप्पा मारणे, संवाद साधने, टीव्ही पाहणे, मित्रांसोबत वेळ घालणे, यासारख्या गोष्टींना लगाम घालण्यात येत आहे. मुलांना मनसोक्त खेळणे, मित्रांसोबत बाहेर जाणे, मामाच्या गावाला जाणे, वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाणे, सणवार, उत्सव एकत्र येऊन साजरा करणे. या गोष्टीचा आनंद आजकालच्या मुलांना मिळत नाही. याचे कारण म्हणजे पालकांनी आणलेले बंधन होय. कारण पालकांना वाटते माझ्या मुलांनी या सर्व गोष्टी जर केल्या, तर त्याचा अभ्यासावर परिणाम होईल. त्याचा वेळ व्यर्थ जाईल. त्याची गुणवत्तेची क्रमवारी घसरेल. आपण आपल्या पाल्यांना ज्या प्रकारे शैक्षणिक बंधने घालून दिलेली आहेत. यामुळे मुलांना स्वतःच्या कला, आवड, छंद जोपासता येत नाही. मुलांचे बालपण हरवले जात आहे. मनाच्या विरोधात जाऊन त्यांना अभ्यास आणि फक्त अभ्यासच करावा लागतो. यातूनच मुलांची निराशा वाढत जाते. मुलांना नैराश्यात ढकललेले जाते. यातुन मुले आत्महत्या सारखा पर्याय निवडतात. याला कुठलीही शिक्षणपद्धती किंवा अभ्यासक्रम, शाळा जबाबदार नाही. तर पालकांच्या आपल्या मुलाप्रती वाढलेल्या अपेक्षा आहे. म्हणून येणाऱ्या काळात पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांना त्यांच्या कलेनुसार, आवडीनुसार शिक्षण घेऊ द्यायला हवे. तरच देशात कलाकार, खेळाडू, लेखक, समाजसुधारक, विचारवंत, पुढारी निर्माण होईल. देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी होईल.कारण नोकर होण्याऐवजी मालक या देशात तयार होतील. शिक्षण फक्त नोकरीसाठी नसून ते व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आहे. माणूस उत्तम घडला पाहिजे. आजचा तरुण आपल्या देशाचा उद्याचा नागरिक आहे. तो स्वतःच्या विचारांनी व कर्तुत्वाने घडलेला असला पाहिजे. आपण आपल्या पाल्याकडून वाढलेल्या अपेक्षा कमी करूया व मुलांना स्वतःच्या आयुष्यात मनमुराद जगण्याचे स्वातंत्र्य देऊया. स्वतःच्या कलागुणांना जोपासण्याचे, स्वतःचे आयुष्य घडविण्याचे स्वातंत्र्य मुलांना देऊया. तरच खऱ्या अर्थाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणरुपी स्वप्न पूर्ण होईल.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

मूल्यशिक्षण काळाची गरज



   मूल्यशिक्षण काळाची गरज



पुरोगामी महाराष्ट्रात राहत असतांना आठवतात ते फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार, तर राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आठवतात. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला संस्कार आणि विचारांनी नावारूपास आणलेले आहे. आज आपण म्हणतोय जग विज्ञानवादी झाले. विज्ञानाने सर्वत्र प्रगती केली. पण आजही माणूस म्हणून जगतांना गरज आहे ती, उत्तम संस्काराची व चांगल्या विचारांची. आज शिक्षण घेत असताना संस्कार व विचार टिकवण्यासाठी मुल्यशिक्षणाची गरज आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जो-तो उच्च शिक्षणाची कास धरू लागला आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शिक्षणात प्रगती झालेली आपल्याला दिसते. शिक्षणाने डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलीस, शिक्षक, कलेक्टर, तहसीलदार, व्यावसायिक, राजकारणी असे अनेक पदे भूषवणारे माणसं तयार झाली. या पुरोगामी महाराष्ट्रात प्रगती झाली असे दिसून येऊ लाागले. तर याउलट या महाराष्ट्रात भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, चोरी, लैंगिक अत्याचार, खून, मारामाऱ्या, आत्महत्या यासारख्या घटना सुद्धा घडतांना दिसून येतात. असे का घडत असेल याचा विचार केल्यावर असे लक्षात येते की, कुठेतरी मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपण करत असलेल्या चुका आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण जाणुन बुजुन त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येकाने मुल्ये शिकली. पण धावपळीच्या जीवनशैलीत मूल्य पाळायला आपण विसरलो. मूल्यांचा जणूकाही विसर पडला. यातच वर्तमान पत्रातून, बातम्या मधुन, गावाच्या चावडीवरुन, विचित्र घटनां घडलेल्या कळु लागल्या. दिवसागणिक घडणाऱ्या या घटनांनी मन सुन्न होऊ लागले. यातुन असे लक्षात आले की, आजची स्त्री सुरक्षित नाही. तिला घराबाहेर पडतांना दहा वेळा विचार करावा लागतो. मी सुखरूप घरी परत येईल का? येथे माणूसच माणसाचा शत्रू बनत चालला आहे. तरुणांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता वाढली. तरुण व्यसनाच्या आहारी गेला. जो तो स्वतःच्या स्वार्थासाठी येथे धावू लागला. येथे देशाप्रती कोणालाही खंत उरली नाही. सव्वाशे कोटींचा देश बिनधास्तपणे जगतोय माझ्या मूठभर जवानांच्या धैर्यावर, हिमतीवर. आज प्रत्येकाला राष्ट्रभक्तीचा विसर पडत चालला आहे. सामाजिक परिस्थिती खालावत चाललेली आहे. यावर उपाय म्हणून आज प्रत्येकांने श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक, दृष्टिकोन, सौजन्यशीलता, सर्वधर्म समभाव, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वक्तशीरपणा, संवेदनशीलता या मूल्यांना अंगीकृत करण्याची गरज आहे. मुल्यशिक्षण काळाची गरज आहे. या मूल्यशिक्षणातुन स्त्रीयांचा आदर करणे, ती कुटुंबातील असेल किंवा कुटुंबाबाहेरची तिचा योग्य तो आदर करणे, सन्मान राखणे, तिला समानतेची वागणूक देणे. हे प्रत्येक पुरुषांचे कर्तव्य आहे. याची जाणीव समाजातील प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्याचबरोबर श्रमदान करणे काळाची गरज आहे. श्रमदानातून गावाचा विकास साधता येऊ शकतो. म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन श्रमदान केले पाहिजे. आजचा देशाचा युवक हा देशाला प्रगतीपथावर नेणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक युवकाने राष्ट्रभक्ती जोपासली पाहिजे. या राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य ओळखले पाहिजे. सर्व जाती धर्मातील मानव समुहाने एकत्र येऊन सलोख्याने राहिले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने स्वतः मध्ये मुल्य रुजवली पाहिजे. प्रत्येकाने मूल्यांचा आदर करून ती मनोमन जोपासली तर देशात घडणार्‍या घटनांचा, गुन्हेगारीचा, वाईट प्रवृत्तीचा, नाश होईल. या पुरोगामी महाराष्ट्रातील चांगले संस्कार व उत्तम विचार टिकवण्यासाठी मूल्यशिक्षण काळाची गरज आहे. एकविसाव्या शतकातील पालकांनी आपल्या मुलानमध्ये बालवयापासून मुल्य रुजवली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतुन मुलांना मुल्यांची गरज लक्षात आणुन दिली पाहीजे. रोजच्या दैनंदिन वापरात होत असलेल्या चुका, घडत असलेल्या वाईट घटना लक्षात आणुन दिल्या पाहिजे. यामुळे आजची नविन पिढी मुल्यशिक्षणावर भर देतील. मुल्यांची फक्त ओळख असून चालणार नाही. तर वेळोवेळी रोजच्या जगण्यातून मूल्ये दिसुन आली पाहिजे. मुल्य फक्त शिक्षणापुरती मर्यादित नाही. तर जीवन जगत असतांना संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीचे ते उत्तम संस्कार आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
रा.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
9823425852

Monday, 27 July 2020

प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

        प्रथम महिला शिक्षिका         क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढिवादी,परंपरा असणार्‍या देशात स्त्रीला समाजात चूल आणि मूल एवढेच स्थान होते.स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते,शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते.त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला.सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून जवळच असलेल्या नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते.वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते.सावित्रीबाई फुले ह्या एकुलत्या एक लाडकी लेक होत्या.त्या काळात बालविवाहाची पद्धत होती.त्यामुळे सावित्रीबाई सात वर्षाच्या होताच त्यांच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली.एक चांगला नवरा मुलगा शोधून सावित्रीबाई फुले यांचा विवाह करावा या विचारात त्यांचे वडील होते.यातूनच ज्योतिबा फुले यांच्याशी 1840 मध्ये त्यांचा विवाह झाला.विवाहाच्या वेळी ज्योतिबा फुले तेरा वर्षांचे तर सावित्रीबाई नऊ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना बालवयापासूनच शिकावे असे मनातून वाटत होते.शिक्षणाविषयी त्यांना आवड होती.ज्योतिबा बरोबर सावित्रीबाईंचा विवाह झाल्यावर त्यांना मात्र त्यांच्या मनातील शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली.या दरम्यान ज्योतिबांना नेहमी वाटायचे स्त्रियांनी शिकावे शिक्षणामुळे स्त्री शिकली तर तिचा रूढी-परंपरा, छळ यातून सुटका होईल.स्त्रीला समाजात मान-सन्मान मिळेल.या विचारसरणीने ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाचा आरंभ केला.सावित्रीबाईंना घरीच ते शिकवू लागले.दिवसभर काम करून सावित्रीबाई फुले घरीच शिक्षण घेऊ लागल्या.ज्योतिबा फुलेंनी शिकवलेले शिक्षण सावित्रीबाई लक्षपूर्वक ऐकत असत. वेळ मिळेल तसा त्याचा सराव करत.ज्योतीबा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई लिहायला आणि वाचायला शिकल्या.घरातून शिक्षणाचा संस्कार मिळत असल्यामुळे सावित्रीबाईंनी अतिशय आनंदाने शिक्षण स्वीकारले .त्या लिहायला-वाचायला लागल्या.यादरम्यान ज्योतीबा फुलेंनी पुणे येथे बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यात 1जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा काढली.समाजातील मुलींनी शिक्षण मिळावे या हेतूने शाळा काढण्यात आली होती. शाळा काढल्यानंतर मात्र एक अडचण निर्माण झाली.त्या शाळेतील मुलींना शिकवायला कुणी शिक्षक येईना.कारण या काळात समाजात मुलींनी शिक्षण घेणे पाप समजले जायचे.आणि मुलींना शिकवायचे म्हणजे हे तर महाभयंकर पाप आहे.यामुळे कोणी शिक्षक पुढे येत नव्हता.त्यावेळी जोतिरावांनी सावित्रीबाईंना विचारणा केली.तुम्ही मुलींना लिहायला वाचायला शिकवा. यावेळी सावित्रीबाईनी लगेच होकार दिला.त्या शाळेत जाऊन गोरगरीब मुलींना एकत्र जमवुन शिकवू लागल्या.एक स्त्री मुलींना एकत्रित करून शिक्षण देत आहे.ही बातमी पुण्यात वार्‍यासारखी पसरली. पुण्यातील अतिकर्मठ लोकांनी याला तीव्र विरोध केला. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे रूढी परंपरेच्या विरोधात आहे. स्त्रियांना शिक्षण देता येणार नाही.याचा कडाडून विरोध झाला पाहिजे.यापुढे कोणीच अशी हिंमत केली नाही पाहिजे.यासाठी अतिकर्मठ लोक एकत्र येऊन सावित्रीबाईंना विरोध करू लागले.त्यांना रस्त्यावर अडवून त्यांनी मुलींना शिक्षण देऊ नये असे त्यांना समजवण्यात आले.परंतु सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देण्याचे काम चालूच ठेवले.यावेळी याविरोधात अतिकर्मठ लोकांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले यांना विरोध म्हणून त्यांच्या अंगावर दगड,चिखल, शेण फेकून मारले व सावित्रीबाई फुलेंना कडकडून विरोध केला.मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करून मुलींना शिक्षण देण्याचे काम सावित्रीबाई फुलेंनी चालूच ठेवले.खऱ्या अर्थाने या लोकांना ही मोठी चपराक होती.ज्योतीबांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाच्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले.आपल्या कार्याप्रती निष्ठा ठेवली.समाजातील विरोधाला धुडकावून स्त्री शिक्षणाचा वसा सुरूच ठेवला.यादरम्यान फुले दांपत्यांचे शिक्षणाचे कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचा मेजर कँडी या इंग्रज अधिकाऱ्याच्या हस्ते जाहीर सत्कार केला.महात्मा फुले यांनी काढलेल्या शाळांना सरकारी अनुदान ही जाहीर केले.फुले दांपत्यांनी शिक्षणाचे काम चालू ठेवले. शिक्षणाबरोबरच सावित्रीबाई फुलेंनी काही क्रूर रूढींनाही आळा घातला.बाल विवाहप्रथेमुळे अनेक मुलीचे लहानपणीच लग्न व्हायचे.यातच एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले.तर तिला एक तर सती जावे लागे किंवा मग तिचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा स्त्रीला कुणाचातरी बळी व्हावा लागे.या छळाला कंटाळून स्त्रिया आत्महत्या करत असत.स्त्रीभ्रूणहत्या करत असत.ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊन ते यशस्वीतेसाठी सावित्रीबाईंनी प्रयत्न केले.प्रत्येक कार्याविषयी निष्ठा बाळगली.लेखिका, कवियित्री, माता,समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले.पुढे पुण्यात 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्या लोकांसाठी काम केले.दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या आणि 10 मार्च 1997 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.समाजातल्या दीनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या,स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या,सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ज्योतीबांच्या अर्धांगिनी म्हणून शोभल्या.त्यांच्या थोर सामाजिक कार्या विषयाची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी सावित्रीबाई यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.सावित्रीबाई फुलेंनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचे आज महाकाय वटरुक्षात रुपांतर झाले.आज प्रत्येकजण या शिक्षणरुपी वटरुक्षाखाली सामावून गेले.आज प्रत्येक स्त्रीला शिक्षणाची व्दारे खुली असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता येते.सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणरुपी आशिर्वादामुळे देशाचे प्रत्येक पद स्त्रीयांनी भुषविले आहे.यामध्ये राष्ट्रपति, पंतप्रधान,मुख्यमंत्री,मंत्री, जिल्हाधिकारी, डाॅक्टर, वकील,पोलीस,खेळाडू, समाजसुधारक अशी अनेक पदे स्त्रीयांना भुषविली आहे.व यापुढेही भुषवतील यात शंका नाही. समाजाने फक्त सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित असणारा स्त्रीयांचा सन्मान राखावा एवढीच माफक अपेक्षा.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

चला कोरोना विरुद्ध एकत्र लढुया

       चला कोरोना विरुद्ध एकत्र लढुया

कोरोना नावाची दहशत सध्या जगाने घेतली आहे. अनेक देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. यातच भारतात सुद्धा कोरोनाने हळूहळू आपला प्रसार वाढविला आहे. रोजच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोनाची दहशत प्रत्येक भारतीयांच्या मनावर आदळत आहे परंतु भारत हा असा देश आहे. ज्याला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. भारत इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक संकटावर मात करत पुढे आलेला आहे. भारताच्या इतिहासात डोकावले तर अनेक संकटे भारतात आली. व प्रत्येक संकटावर मात करत भारत आज ताठ मानेने जगाच्या स्पर्धेत टिकून आहे. अठराशे च्या दशकात सुरुवातीला इंग्रज भारतात आले व दीडशे वर्षे भारतावर राज्य गाजविले. संपूर्ण भारतात स्वतःचा प्रसार वाढविला. देशातील जनतेला गुलाम बनविले. देश लुटला जाऊ लागला. या संकटावर मात करण्यासाठी सुद्धा भारतातील जनता एकत्र आली. एकजुटीने या संकटाचा सामना करत राहिली. जनसामान्यांच्या स्वातंत्र्याच्या इच्छाशक्ती पुढे इंग्रज नतमस्तक झाले व भारत सोडून निघून गेले. भारत देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून आजपर्यंत भारत देश एकजुटीने, एकसंघतेने ताठपणे उभा आहे. स्वतंत्र भारताच्या 73 वर्षात अनेक छोट्या मोठ्या संकटावर मात करत आला आहे. आता सुद्धा कोरोना सारख्या विषाणूच्या विरुद्ध देश पुन्हा एकदा लढतोय. या लढ्यात संपूर्ण भारत देशातील जनता कोरोना च्या विरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी सज्ज आहे. फरक एवढाच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांना एकजुटीने रस्त्यावर उतरावे लागले होते. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने घरात थांबायचे आहे. केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाच्या आहे. गर्दी टाळणे, गरज नसताना घराच्या बाहेर न पडणे. समूहाने एकत्र न जमणे, स्वच्छतेच्या सवयी चे पालन करणे, लक्षणे जाणवताच त्वरीत डाॅक्टरांना दाखविणे. अशा गोष्टीचे पालन एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने करायचे आहे. भारत हा सुसंस्कृत व संस्कारित देश आहे. येथे संस्कृतीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. भारताची ओळख संस्कृती व संस्कार आहे. हीच ओळख आपण कोरोनाच्या विरोधात दाखवण्याची गरज आहे. कोरोना सारखा विषाणूलाही देशाच्या जनतेच्या पुढे झुकायला लावणारी इच्छाशक्ती या देशात आहे. फक्त गरज आहे ती प्रत्येक नागरिकाने स्वतःमध्ये इच्छाशक्ती जागवण्याची. जगाच्या या संकटातून भारताला सहजपणे बाहेर काढण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. हे ओळखून प्रत्येकाने वागणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा भारत देशाला ताठपणे उभे राहण्यासाठी कोरोनाला हरविणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येकजण कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला, सरकारला मदत करूया. व भारतीय जनतेच्या इच्छाशक्ती पुढे कोरानाला पळवून लावू या.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

नम्रता हा जीवनाचा अलंकार


नम्रता हा जीवनाचा अलंकार


कुटुंबात बालक जन्माला आल्यापासून त्याची आई त्याच्यावर जगातले उत्तम संस्कार करत राहते. प्रत्येक बालकाला कुटुंब, शाळा, समाज या माध्यमातून संस्कार मिळत असतात. नम्रता असाच विचारांचा उत्तम संस्कार आहे. जन्माबरोबरच प्रत्येकाला भगवंत नम्रता प्रधान करतो. लहापणी इतरांशी नम्रपणे वागायला आपल्याला शिकविले जाते. माणूस जसजसा मोठा होत असतो. तसा त्याच्या वैचारिक कुवतीनुसार तो नम्रता अंगीकारत असतो. जुनी माणसं म्हणायचे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच इतरांशी वागावे. याचा अर्थ बोलताना अतिशय गोड बोलावे. आपल्या बोलण्यातून कधीही राग व्यक्त होता कामा नये. ऐकतांना शांतपणे ऐकावे व बोलताना शांतपणे गोड बोलावे. समोरच्याचे मन दुखावणार नाही अशा पद्धतीचे बोलणे असावे. कारण शब्द हे विचारांचे शस्त्र आहे. ते जपूनच वापरले तर समोरच्याच्या मनाला जखमा होत नाही. जीवनात कितीही मोठे झालो. तरी इतरांपुढे झुकायची लाज वाटायला नको एवढी नम्रता अंगीकारली पाहिजे. प्रत्येक वेळी नम्रपणे वागायला हवे. नम्रता ज्याच्या अंगी त्याचे मोठेपण थोर असते. जीवनात इतरांशी वागत असताना कळत नकळत घडलेल्या चुका स्वीकारण्याची व चुका सुधारण्याची कुवत प्रत्येकात असते. फक्त ती स्वीकारताना प्रत्येक जण त्यामध्ये काटकसर करतो. प्रत्येक गोष्ट नम्रपणे स्वीकारली तरच माणूस उत्तम घडतो. कुटुंब, शेजारी, समाज यातील लहान मोठ्यांचा आदर करण्याची सवय लहानपणापासून अंगीकारली की नम्रता हळूहळू विचारात रुजायला लागते. ज्याच्याजवळ नम्रता गुण आहे. त्याचे विचार मोत्यासारखे चमकतात. तोच मनुष्य इतरांसाठी आदर्श बनतो. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदाच्या अंगी असलेल्या नम्रता या गुणामुळे त्यांचे विचार आज संपूर्ण भारतीयांना प्रेरणादायी आहे. शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये त्यांना भाषणाला सर्वात शेवटी स्थान दिले. पंरतु विवेकानंदानी अतिशय नम्रपणे आपल्या जागेवरुन उठुन उपस्थितांना नमस्कार केला. भाषणाला सुरवात करताच माझ्या बंधू आणि भगिनींनो हे शब्द उच्चारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता. यावरुन हिंदू धर्माचे महत्त्व व विवेकानंद यांच्या अंगी असलेल्या नम्रतेचे दर्शन संपूर्ण जगाला झाले होते. नम्रता हा जिवनाचा अलंकार आहे. तो सर्वांनी जपुन ठेवला पाहिजे. त्याच्या जिवनात योग्य वापर केला पाहिजे.


‘‘ उसके सामने सर हमेशा झुकाओ, जिसने तुम्हें सर उठाकर
जीना सिखाया ’’ !


✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

इंटरनेटच्या काळात वाचनाचा छंद जोपासुया


                   इंटरनेटच्या काळात
                वाचनाचा छंद जोपासुया


माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पुस्तक होय. माणसाला बालपणापासून घडवण्याचे काम संस्कार करतात. कुटुंबातून व शाळेतून उत्तम संस्कार मिळत असतात. असाच वाचनाचा संस्कार बालपणी आपले गुरुजी आपल्याला देतात. अ आ इ पासून ज्ञ पर्यंत आपली स्वर व व्यंजनाशी ओळख होते. हळूहळू आपण वाचायला शिकतो. वाचनामुळे आयुष्यात किती मोठा फायदा होतो, ते त्या वयात कळत नाही. पण आपण वाचन करत जातो. हीच वाचनाची सवय माणसाला आयुष्यात समृद्ध बनवते. कारण प्रत्येक जण ज्या प्रकारचे वाचन करतो, त्यानुसार त्याचे विचार बनत जातात. विचारावर त्याचे आचरण घडत जाते. आचरणातून त्याचे कार्य घडत असते. म्हणून वाचनाची सवय ही प्रत्येकाला असलीच पाहिजे. वाचनामुळे माणूस किती मोठा होतो, याचे उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शाळेत जायला लागले. त्या काळातील समाजाने अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना खूप छळले. यामध्ये वर्गातील विद्यार्थी सुद्धा मागे नव्हते. वर्गातील मुले बाबासाहेबांशी बोलत नसत. त्यांना जवळ बसू देत नसत. कुणी स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करत नव्हते. यातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाशी मैत्री झाली. याचा फायदा असा झाला की, याकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली. मिळेल ते पुस्तक त्यांनी वाचुन टाकले. यामुळे त्यांच्या ज्ञानात प्रचंड वाढ झाली. वाचनामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अठरा-अठरा तास अभ्यास करण्याची सवय लागली होती. वाचनामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले. आज संपूर्ण भारत देशात व देशाच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांचे विचार व कार्याची प्रेरणा घेतली जाते. म्हणून प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. भारत देशाने विज्ञान व तंत्रज्ञानात प्रगती केली. या प्रगतीचा प्रभाव थोडासा आजच्या तरुण पिढीवर विरुद्ध होताना दिसत आहे. त्याचे कारण असे की आजची तरुण पिढी मोबाईल व इंटरनेट मध्ये प्रचंड गुंतली आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे अत्याधुनिक मोबाईल आहे. त्यामुळे वाचनाची सवय हळूहळू कमी होत चालली आहे. कुटुंबातील संवाद कमी होत आहे. गप्पागोष्टी, संवाद, चर्चा होताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, लॅपटॉप, वाट्सअप, फेसबुक, ट्विटर, यासारख्या गोष्टींचा अतिवापर होय. जुन्या काळात प्रत्येक जण न्यूज पेपर आवडीने वाचायचा. वाचनालयात जाऊन वाचन करायचा. अनेक कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, प्रवास वर्णन, नाटक, संवाद पत्रिका, आवडीने वाचायचे. यामुळे वैचारिक पातळी अत्यंत चांगली होती. आज आपण पाहतो शिक्षणाची टप्पे पार करताना प्रत्येक जण वाचन करतो. अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी वाचन करतो. स्वतःची ध्येय साध्य झाले की, जो तो आपापल्या व्यवसायात, नोकरीत, काम धंद्यात स्थिरावतो. हळूहळू वाचनापासून दूर होतो. माणसाला ज्याप्रमाणे शारीरिक वाढ व विकासासाठी उत्तम आहार व व्यायामाची गरज आहे. त्याप्रमाणे बौद्धिक विकासासाठी वाचनाची गरज आहे. प्रत्येकाला लहानपणापासून वाचण्याची सवय लागावी यासाठी राज्यसरकारने 15 ऑक्टोंबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सुरू केला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. डॉ.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वजण नियमित वाचन करूया व इतरांना सुद्धा वाचनाची प्रेरणा देऊया.


“ वाचाल तर वाचाल. ’’

“ एक पुस्तकच सुंदर मस्तक घडवते. ”

“ पुस्तक वाचा ज्ञान वेचा. ”

“ वाचन केल्याने मिळते ज्ञान, दुर पळते आपले अज्ञान. ”

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

दिवसाची सुरुवात सुविचारांनी व्हावी !

 दिवसाची सुरुवात सुविचारांनी व्हावी ! 

जीवन जगतांना प्रत्येकाला सुंदर विचारांची गरज आहे. सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सुंदर विचारांनीच प्रत्येकाचा दिवस मार्गक्रमण करत असतो.सकाळी झोपेतून उठले की प्रार्थना,श्लोक म्हणूनच दिवसाची सुरुवात करावी. सकाळीच अंधारावर मात करत सुंदर प्रकाश किरणे घेऊन उगवणाऱ्या सूर्य देवाला नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करायला हवी.मग सकाळी आंघोळ करताना असेल की देव पूजन करताना असेल भगवंताचे स्मरण करून सुंदर विचारांनी दिवसाची सुरुवात झाली.की दिवस अतिशय आनंदी जातो.सुंदर विचारांनी सुरु होणारे काम सुंदर फळ रूपच पूर्ण होत असते.महाराष्ट्र संतांची भूमी असलेले राज्य आहे.समाजसुधारकांचा वसा असलेल्या या महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे हे राज्य आहे. समाजसुधारक,थोर विचारवंत, संत महात्म्य यांच्या विचारांनी दिवसाची सुरुवात व्हावी.कारण सुंदर विचार मनाला सुंदर बनवत असते.सुंदर मनच सुंदर कार्य करत असते.सुंदर कार्यच प्रत्येकांची ओळख निर्माण करत असते.सुविचार म्हणजे सुंदर विचार होय.हे सुंदर विचार महाराष्ट्रातील संत,समाजसुधारक, शास्त्रज्ञ,थोर विचारवंत यांच्या लेखन साहित्यातून आपल्याला मिळते.कथा, कादंबरी,अभंग,गवळण,भारुड आदी प्रकारातून सुंदर विचार आपल्याला मिळत असतात.या सुंदर विचारांना अंगीकृत केले पाहिजे.व सुंदर विचारांनी दिवसाची सुरुवात करावी.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

स्पर्धेच्या युगातील माझी मराठी शाळा

स्पर्धेच्या युगातील माझी मराठी शाळा


एकविसाव्या शतकात भारत देश जगामध्ये महासत्तेकडे वाटचाल करतोय.आज भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली.या देशाच्या वाटचालीत माझा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली.या प्रगतीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे.शिक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात बदल होत गेले.महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत मागे वळून पाहिले तर, आजही आठवते ती प्रत्येक गावात,तांड्यात,वाडी-वस्तीवर, डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या छोट्या छोट्या गावात असलेली माझी जिल्हा परिषदेची मराठी शाळा.या महाराष्ट्रातील प्रत्येक जातीधर्मातील गोरगरीब,श्रीमंत,दिन दुबळ्या, समाजातील प्रत्येकाला आनंदाने शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची शाळा आजही तेवढ्यात ताकतीने उभी आहे. इंग्रजीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहे.आज आपण शिक्षणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की प्रत्येकाला इंग्रजीने झपाटलेले आहे.जो तो इंग्रजी शाळेच्या मागे धावतोय.इंग्रजांनी दीडशे वर्ष भारत देशावर राज्य केले.शेवटी जाता जाता इंग्रजीचा प्रभाव सोडून गेले.इंग्रजी भाषा वाईट आहे असे नाही.इंग्रजी येणे काळाची गरज आहे.पण त्यासाठी इंग्रजी शाळेतच शिकले पाहिजे असे नाही. आजही मराठी माध्यमाच्या शाळेतुन सर्वांगीण विकास साधणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.हजारो विद्यार्थी मराठी शाळेत उत्तमातले उत्तम शिक्षण घेऊन घडत आहे.आपण गेल्या दोन चार वर्षात एमपीएससी, यूपीएससी,अशा स्पर्धा परीक्षेचा निकाल पाहिला तर मराठी शाळेत शिकलेल्या विद्यार्थी टक्का वाढलेला दिसत आहे.पण याच स्पर्धेच्या युगात माझ्या मराठी शाळेला कमी लेखले जाऊ लागले.मराठी शाळेत शिकणाऱ्यांचा कल इंग्रजी शाळेकडे वळला जाऊ लागला आहे.पण काळ्याच्या ओघात मागे डोकावून पाहीले तर,आपले आईवडील,आजी आजोबा याच मराठी शाळेत शिक्षण घेऊन उत्तम नागरिक बनले.वेगवेगळ्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण भुमिका त्यांनी पार पाडलेल्या आहे.या महाराष्ट्रातील समाजसुधारक, राजकिय नेते, अधिकारी,खेळाडु,कलाकार,शास्त्रज्ञ याच मराठी शाळेने घडवलेले आहे.हा इतिहास विसरून चालणार नाही. आजच्या पालकाची शिक्षणाविषयी व आपल्या पाल्याविषयीची घौडदौड पाहता,फक्त इंग्रजी शाळाच मुलांना घडवू शकतात.हा मोठा गैरसमज पसरत आहे.या विचारसरणीमुळे शिक्षणाचे बाजारीकरण होतांना पाहायला मिळत आहे.आज शिक्षण फक्त श्रीमंताचे आहे.असे वाटायला लागले.वास्तव परिस्थितीमध्ये तसेच घडतांना दिसत आहे.सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याची कारणे म्हणजे कौलारू व पत्राच्या शाळेच्या ऐवजी मोठ्या मोठ्या इमारती झाल्या. पांढराशुभ्र शर्ट व खाकीच्या पॅन्टची जागा रंगीबेरंगी गणवेशाने घेतली. भिंतीवरचा खडु फळा आता व्हाईट बोर्ड व मार्कर झाला.पाठीवर दप्तराचे ओझे व स्पर्धेचे युगातील स्वप्न घेऊन विद्यार्थी शाळेत येऊ लागला.पण आजच्या पालकांनी व समाजांनी कुठेतरी जागृत होणे गरजेचे आहे.मुलांना आपण किती मोठ्या शाळेत शिकवतो.किंवा किती भौतिक सुविधा असलेल्या शाळेत शिकवतो.यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण किती आनंददायी व तणाव मुक्त मिळत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना मशनरी बनवायचे नाही.तर मशनरी निर्माण करणारे विद्यार्थी घडवायचे आहे.बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा सरकारने तयार केला.6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली.वाडी-वस्ती,तांडा,गावागावात 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक,मोफत गणवेश,दुपारी शालेय पोषण आहार, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या अशा योजनेच्या माध्यमातून मराठी शाळेतील आजचा विद्यार्थी उत्तम शिक्षण घेत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये,म्हणून ई लर्निंग सारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.येणाऱ्या काळात मराठी भाषा व मराठी शाळा टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.हीच मराठी शाळा येणाऱ्या पिढीला सुद्धा घडवेल हा विश्वास प्रत्येकाने मनी ठेवला पाहिजे. आजच्या पिढीला हा विश्वास पालकांनी व समाजाने दिला पाहिजे.आज देशाची प्रगती पाहता खेळ,कला, साहित्य,विज्ञान,राजकारण, समाजकारण,आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे.यामध्ये माझ्या मराठी शाळेचा फार मोठा वाटा आहे.याच मराठी शाळेचा मला खुप अभिमान आहे.म्हणूनच आजही मला स्पर्धेचे युगात आठवते ती माझी मराठी शाळा.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


लॉकडाऊनमुळे कौटुंबिक स्नेह वाढला



 लेख

लॉकडाऊनमुळे कौटुंबिक स्नेह वाढला

पूर्वीच्या काळातील माणुस व त्याचे जीवनमान इतिहास जमा झाले असे वाटु लागले होते.कारण पूर्वीच्या काळातील माणुस अतिशय शांततेचे व आनंदाचे जीवन जगत होता.त्याच्या जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भय,ताण तणाव,स्पर्धा दिसत नव्हती. तो त्याच्या कुटुंबाला लागणाऱ्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी पुरताच विचार करत होता. मर्यादित स्वतःच्या गरजा पुरताच काम करत होता.हळूहळू परिस्थिती बदलली. एकविसाव्या शतकाला सुरुवात झाली. या एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता,माणसाचे जीवनमान अतिशय जलद गतीचे व वेळेच्या चौकटीत बांधले गेले आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घड्याळातील काट्याप्रमाणे मनुष्य धावत आहे.या प्रगतीच्या मृगजळामागे धावतांना तो कधी मागे वळुन पाहतच नव्हता.माणूसच माणसाला हरवायला निघाला होता. जगाच्या स्पर्धेत टिकतांना स्वतःचे आयुष्य जगायला तो विसरला.अचानक कोरोना सारख्या विषाणूने या स्पर्धेला ब्रेक लावला.कुठेतरी एकदम सुन्नपणा आला. जगात महासत्ता म्हणून मिरवणारे अनेक देश कोरोनाच्या या संकटात चिंतेत पडले.या चिंतेने मनुष्याच्या जगण्याला बदलवून टाकले.माणूस स्वतःच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळाप्रमाणे जगायला लागला.याचे कारण असे की,कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी एकविस दिवसाचे लाॅकडाऊन जाहीर केले. संपूर्ण भारत वासियांना एकविस दिवस घरातच राहण्याचे आव्हान केले. एकवीस दिवस घरातच बसून दैनंदिन कामे पूर्ण करायचे असे सांगितले.मग ती स्वतःची कामे असतील,अथवा प्रशासनाचे काम असेल घरी बसून पूर्ण करायचे.या एकविस दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये प्रत्येक माणूस सकाळी झोपेतूनच रिलॅक्सपणे उठत आहे.कुठलाही ताण तणाव चेहऱ्यावर नाही.कुठलीही स्पर्धा,घाई,धावपळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्णवेळ स्वतःच्या कुटुंबात तो घालवत आहे.कुटुंबातील लोक एकमेकांच्या जवळ आली.एकमेकांना वेळ देऊ लागली. नाष्टा,चहा,जेवण या गोष्टी एकत्र बसून करून लागली. रोजच्या दैनंदिन कामामुळे मग व्यवसाय असेल किंवा नौकरी या व्यस्ततेमुळे संपूर्ण कुटुंब आपआपल्या वेळेनुसार करणाऱ्या गोष्टी आज आनंदाने एकत्र करत आहे.यामध्ये जेवण करणे,टीव्ही पाहणे,गप्पा,गोष्टी,संवाद,हसी मजाक पुन्हा एकदा कुटुंबात घडत आहे.त्याचबरोबर बालपणीचे आवडते छंद शिक्षण,नोकरी,व्यवसाय यामध्ये कुठेतरी मागे पडले होते.कारण जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून प्रत्येकजण छंद,आवड हे विसरला होता.स्वतःला या स्पर्धेत पुढे रेटून नेत होता.पण या एकविस दिवसाच्या लाॅकडाऊन मध्ये पुन्हा एकदा बालपणीचे छंद आठवले. यामध्ये चित्र काढणे असेल,गाणी म्हणणे,गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे,कविता,कथा,कादंबरीचे वाचण,इत्यादी. याबरोबरच चार भिंतीच्या आतील खेळ कॅरम,बुद्धिबळ, चंफुल,सोळाखडी हे खेळ नविन पिढीसोबत खेळता येत आहे.अशा गोष्टी नकळत घडत आहे.व यातून प्रत्येकाला आनंद मिळत आहे.अगदी बालपणात गेल्यासारखा अनुभव प्रत्येकाला येत आहे.आई,वडील,पत्नी,मुले यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारत मारत हळूच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू निश्चितच पैसा,संपत्ती, प्रगती यापेक्षा ते मोठे आहे.या लाॅकडाऊन च्या काळात निश्चितच प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या अगदी जवळ आला आहे. मन,भावना,विचार या गोष्टी फक्त बोलून चालत नाही.तर त्या अनुभवाव्या लागतात.यासाठीच माणूस समूहाने राहत आलेला आहे.समूहातून निश्चितच प्रेम,आनंद,स्नेहभाव एकमेकांना मिळतो.व यातून माणूस वैचारिक व सुसंस्कारित बनत असतो.अशा माणसाच्या हातूनच उत्तम कार्य घडत असते.एकविस दिवसाच्या लाॅकडाऊनने निश्चितच प्रत्येकाला बालपण व तरुणपणाची आठवण करून दिली.या आठवणींनी प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात मागे वळून पाहता आले.कधी कधी नकळत चांगल्या गोष्टी घडतात.कोरोनाने प्रत्येकाला घरात बसायला लावले.पण या मोबदल्यात कौटुंबिक स्नेह वाढला हे तेवढेच खरे आहे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु.पो.किनगाव राजा
ता. सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852

' सत्य ' मुखी वदावे सर्वकाळ !


" सत्य " मुखी वदावे सर्वकाळ !


मानवी जीवन संस्कार व संस्कृतीने घडलेले असते. संस्कार व संस्कृतीचे पालन करताना, अनेक चांगल्या गोष्टीचे पालन केले जाते. चांगल्या सवयी माणसाला उत्तम घडवतात. चांगल्या सवयी व चांगली माणसं हे समाजाची प्रतीक आहे. माणूस अनेक कलागुणांनी नटलेला असतो. अनेक चांगल्या सवयींनी घडलेला असतो. मानवाची प्रतिमा ही त्याच्या सत्यावर अवलंबून असते. सत्याची परीक्षा ही कठोर असते. परंतु त्याचा विजय दीर्घकाळ टिकणारा असतो. माणसाला जगत असतांना पावला पावलावर सत्याची परीक्षा द्यावी लागते. माणसाला चांगल्या सवयी बालपणापासून अंगवळणी पडलेल्या असतात. यातीलच एक चांगली सवय म्हणजे खरे बोलणे. सत्य बोलणारी माणसं नेहमी सूर्याच्या प्रकाशा सारखे उठुन दिसत असतात. सत्य हे नेहमी सूर्यासारखे प्रखर व गंगेच्या पाण्यासारखे नितळ असते. सत्याचा सुगंध हा चोहीकडे सदैव दरवळत असतो. आयुष्यात नेहमी सत्य बोलावे. माणसाच्या वाणीतून निघणारे शब्द हे त्याचे प्रतिबिंब उमटवत असतात. माणसाचे कर्तव्य मान-सन्मान अबाधित राखण्यासाठी मनुष्य हा सत्यवचनी असावा. समाजात माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या खऱ्या बोलण्यावरून ठरत असते. सत्य बोलणारी माणसं ही समाजाला आवडणारी असतात. जीवनात कितीही संकटे आली, कितीही मोठा स्वार्थ, फायदा असला तरी सत्य वचनाचा मार्ग सोडू नये. सत्य नेहमी परीक्षा घेत असते. पण सत्याचा निकाल हा चिरकाल टिकणारा असतो. समाजात सत्य बोलणाऱ्या लोकांना त्रास झालेला आहे. संत महात्म्य, समाजसुधारक, राजे-महाराजे, थोर विचारवंत यांना अनेक गोष्टीचा त्रास झाला. अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. परंतु त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही. सत्याचा जीवनात सदैव प्रकाश तेवत ठेवला. त्यामुळे ते आज समाजात आदर्श ठरले. समाजात न्याय, नीती व धर्म टिकून आहे तो सत्यावरच. जेव्हा जेव्हा समाजात अन्याय वाढतो. सत्याला किंमत राहत नाही. असत्य वाढू लागते. तेव्हा क्रांती घडल्याशिवाय राहत नाही. आज देशात धर्म टिकून आहे. संस्कृती टिकून आहे. याच्या मुळाशी सत्य हे खोलवर रुजलेले आहे. या देशात राहतांना संस्कार व संस्कृती बरोबरच स्वतःमध्ये सत्य सुद्धा ठासून भरले पाहिजे. तरच माणसाचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडेल. सत्य हीच माणसाच्या जीवनाची खरी परीक्षा आहे. आयुष्यात जन्माला येताना सोबत काही आणले नव्हते व जाताना सुद्धा सोबत काहीच येणार नाही. येथेच मिळवलेले ज्ञान, देह, शरीर सर्व एक दिवस येथेच सोडून जायचे आहे. पण सत्यांनी कमावलेली कीर्ती तुमच्या सोबत येणार आहे. माणसाच्या पश्चात त्याची कीर्तीच त्याची ओळख बनून राहते. माणसाने आयुष्यात सदा सर्वकाळ सत्य बोलावे, सत्य वागावे. येणाऱ्या काळात सत्याची मधुर फळं चाखायची असेल तर जन्माला आलेल्या मुलामध्ये चांगले संस्कार व खरे बोलण्याची सवय बालपणीच रुजवली पाहिजे.

‘‘ सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ’’


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


" क्रोध " विनाशास आमत्रण !



" क्रोध " विनाशास आमत्रण ! 




माणसाचे मन हे उधळणाऱ्या घोड्याच्या टाका सारखे असते. मिळेल त्या जागेवर दौडत राहते. क्षणात जगाची सफर करण्याची ताकत मनात असते. मनाचा मागोवा घेणे म्हणजे समुद्राच्या पाण्याचा तळ गाठण्यासारखे आहे. मनासारख्या गोष्टी घडल्या तर मन आनंदी होते. एखादी नको असलेली सहज गोष्ट घडली तर लगेच मन दुखावते. ती भावनेतून प्रगट होते. त्यालाच क्रोध आला असे आपण म्हणतो. क्रोध म्हणजे विनाशाचे आमंत्रण होय. माणसाला क्रोध आला की, त्याच्या मनावर व विचारावर त्याचा ताबा राहत नाही. आपण कुणासमोर बोलतो, काय बोलतो याचे भान माणसाला राहत नाही. क्रोध मुळात प्रत्येकात असतो. फक्त काही जण प्रगट करतात. तर काहीजण याला आवर घालतात. क्षणाक्षणाला सैरावैरा वायूच्या वेगाने धावणाऱ्या मनावर ताबा मिळवला तर क्रोध येणारच नाही. क्रोध आमचा चांगुलपणा आहे. चांगले वाईट क्षणात ओळखून विचारांना प्रगट व्हायला लावते ते मन. आयुष्यात जन्माबरोबर प्रत्येकाला सुंदर शरीर व सुंदर मन मिळते. पुढे याच शरीराच्या साथीने मन इच्छा, आकांक्षांचा डोंगर सजवायला लागते. यशाची शिखरे व प्रतिष्ठेचा डोंगर रोजच काबीज करावे असे वाटते. आयुष्याच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माणूस क्षण क्षण झिजत राहतो. कधीकधी मात्र ही शिखरे व डोंगर काबीज होत नाही. याचा माणसाला प्रचंड राग येतो. मनुष्य सतत क्रोधित राहतो. यामधून तिरस्काराच्या भावनांनी सतत व्यक्त होतो. त्याचाच क्रोध त्याला जाळत असतो. क्रोध हा स्वतःचाच शत्रू आहे. तो एकदा आपल्या मनावर ताबा करायला लागला की, आपल्या हातून नको असलेल्या चुका घडत जातात. क्रोधामुळे नाती-गोती, यश, प्रतिष्ठा क्षणात धुळीस मिसळते. क्रोधावर नियंत्रण ठेवले नाही तर माणूस अनेक गोष्टींपासून दुरावत जातो. क्रोधाला संयमात रूपांतर करता आले पाहिजे. क्रोधाला आवर घालण्यासाठी योग्य औषध म्हणजे नम्रता होय. नम्रपणा सतत जवळ ठेवला तर क्रोध जवळही भटकत नाही. अहंकाराची वलयं हळूहळू नाहीशी होत जाते. माणसाचा स्वभाव हा वेगवेगळ्या फुलांच्या अलंकारांनी नटलेला आहे. राग, लोभ, मत्सर, अहंकार, नम्रपणा, प्रामाणिकपणा या अलंकारांना ओळखता आले पाहिजे. क्रोधाच्या अंलकारा पेक्षा नम्रतेचा अलंकार अंगी बाळगला, तर जीवन रंगाप्रमाणे उमटून व सुगंधा प्रमाणे सुवाच्छ होऊन जाते. जीवनात मिळविलेल्या अनेक गोष्टींना टिकवण्यासाठी क्रोध आवरता आला पाहिजे. माणसाला जगातील कोणतेच विचार हरवत नाही. तर त्याचा क्रोध त्याला अपयशाची पायरी चढायला लावतो. जगात सुंदर नाती, सुंदर माणसं आहे. ती जपतांना फक्त त्यांना आपल्या  क्रोधाचा स्पर्श होऊ देता कामा नये. सुंदर विचारांची वेसन मनाला सतत घालून ठेवली. व संयमाचा ओलावा पाझरत राहिला तर क्रोध कधीच आपले डोके वर काढणार नाही. एकदा क्रोध नाहीसा झाला की, मनुष्य चंदनाच्या वृक्षाप्रमाणे सतत सुगंधी होऊन जाईल. तो सुंगध  सगळीकडे दरवळत राहील. 

आनंद या जीवनाचा सुंगधापरी दरवळावा, 
झिजून स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा….
पाव्यातला सूर जैसा ओठांनी ओघळावा,
आनंद या जीवनाचा सुंगधापरी दरवळावा…. 

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


Sunday, 26 July 2020

मानवी जीवन कष्टमय


मानवी जीवन कष्टमय



आईच्या गर्भातून मूल जन्माला येते. एक निरागस हास्य घेऊन या जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होते. जन्मानंतर आनंदात स्वतःच्या विश्वात हरवून जाते. हळूहळू जसजसे मोठे होऊ लागते. तसेतसे त्याला प्राप्त परिस्थितीचा अनुभव येत जातो. स्वतःच्या कुटुंबातून, परिसरातून ते अनेक गोष्टी शिकत जाते. स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीनुसार आलेल्या समस्यांना तोंड देत राहते. ताठ मानेने उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. अशा जडणघडणीत ते घडत असताना स्वतःच्या वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या स्विकारत राहते. प्राप्त परिस्थिती नुसार मुलांना शिक्षण व संस्कार दिले जाते. मोठेपणी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, कामधंदा करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ते सतत धडपडत असते. आपण पाहतो आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतात सर्वात जास्त शेती हा व्यवसाय केल्या जातो. अर्थात लहानपणापासूनच मुलांना शेतीविषयी कामे करण्याची, कष्ट करण्याची सवय लागलेली असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे विभाजन होत चालले आहे. पृथ्वीवर पाणी, जमीन यांचे क्षेत्रफळ आहे तेवढेच आहे. परंतु वाढती लोकसंख्या, शहरीकरण, व्यवसाय, उद्योग धंदे, धरण, रस्ते यामुळे जमिनीचे विभाजन होत चालले आहे. यातून शेतीचे क्षेत्रफळ कमी होत आहे. अनेकांना शेती नाही. अनेकांना स्वतःचा व्यवसाय नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा मजुरी करावी लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करावे लागते. कष्ट केल्याशिवाय संसाराचा रथ गाडा चालत नाही. आज देशात सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे अनेकांना काम मिळत नाही. कामासाठी वणवण फिरावे लागते. शिक्षण घेणाऱ्या युवकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. तर एकीकडे शिक्षण नाही म्हणून काम मिळत नाही. अशी अवस्था आधुनिक युगात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक यंत्रसामुग्री मुळे मानवांना मिळणारी कामे बंद झाली. याचे कारण म्हणजे यंत्रसामुग्री मुळे कमी वेळेत जास्त काम होते. कामासाठी पैसा ही कमी लागतो .कामाचा दर्जा सुधारला. यामध्ये गोरगरीब मजुरांच्या हाताला मिळणारी कामे नाहीसे होत चालले आहे. ग्रामीण भागात व शहरी भागात काम मिळाले नाही तर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. काम मिळाल्याशिवाय घाम घाळता येत नाही. घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही. दाम मिळाल्याशिवाय चूल पेटत नाही. ही वास्तव परिस्थिती आज देशात आहे. खेड्यापाड्यात काम मिळत नाही म्हणून दरवर्षी लोक कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहे. शहर हे आर्थिक गतिमानतेचे चक्र फिरवणारे ठिकाण. या ठिकाणी निश्चितच काम मिळते. या आशेवर लोक शहरात येऊन राहतात. मिळेल ते काम दिवसभर करायचे. सायंकाळी दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला घ्यायचा. मिळालेल्या रोजगारातून संध्याकाळच्या पोटासाठी लागणारे अन्नधान्य घ्यायचे. पोटाची खळगी भरायची. ही कामगाराची वास्तविक परिस्थिती आहे. जी आपण नाकारू शकत नाही. परंतु बदल मात्र निश्चित करु शकतो. सरकारने प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. असे धोरण ठरवावे. उद्योग, व्यवसाय उभारुन प्रत्येकालाच काम मिळावे असे धोरण ठरवले पाहिजे. १ मे हा कामगार दिन आहे. महाराष्ट्रात आज कामगारांच्या समस्या अनेक आहेत. वेळोवेळी कामगार आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात. कामगारांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे. वेळेवर वेतन मिळाले पाहिजे. कामगारांना कामावर मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. कामगार हा एक महत्त्वाचा घटक आहे. ही जाणीव सर्वात आधी समजून घेतली पाहिजे. कामगार टिकला तर काम पूर्ण होईल. मनुष्याला जन्माबरोबरच परिस्थितीशी झगडावे लागते. आपला जन्म कुठे व्हावा हे विध्यात्याने आपल्या हातात ठेवले नाही. कोण नोकर होणार आणि कोण मालक हे आपल्या हातात नाही. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द मात्र प्रत्येकात आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात उत्तम कष्ट करत असतो. कष्टाची फळे गोड असतात. जीवनात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. या जगात सहज काही मिळत नाही. अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत कष्ट करत असतो. मुळात मनुष्य जीवन फार कष्टमय आहे. इतर प्राणी, पक्षी यांच्या पेक्षा माणूस खूप कष्टाळू आहे. कारण माणसाच्या आशा-आकांक्षा खूप आहे. तो बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याला या जगाच्या स्पर्धेत यशाचे अनेक उत्तुंग शिखरे चढावी वाटतात. यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत असतो. स्वतः झिजत राहतो. जीवन जगणे एवढेच माणसाचे आयुष्य नाही. त्या पलीकडे काहीतरी नवीन येणाऱ्या पिढीसाठी करून ठेवण्याचे वेड त्याच्या अंगी असते. अपार कष्ट, जिद्द यांच्या जोरावर प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन फुलवत असतो.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
rajendrashelke2018@gmail.com

जन माणसाप्रती माणुसकीची भावना जागवा


जन माणसाप्रती माणुसकीची भावना जागवा

2020 या नवीन वर्षाला सुरुवात झाली.संपूर्ण देशवासीयांनी नवीन वर्षाचे आनंदात स्वागत केले.याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोव्हीड 19 कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.हळूहळू कोरोनाने इटली,अमेरिका अशा अनेक देशांत पसरायला सुरुवात केली.जगात कोरोना संकट थैमान घालत आहे.या संकटात भारता सुद्धा ओढावला गेला.संपूर्ण देशाला या संकटापासून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.राज्य सरकार व केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.भारत हा एक कुटुंब आहे.आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते.त्याचप्रमाणे देशाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक राज्य शासन व केंद्र शासन घेत आहे.भारताच्या पंतप्रधानांनी 21 दिवसांसाठी संपुर्ण भारत देश लाॅक डाऊन केेले.कोरोना या विषाणूची कुठेतरी साखळी खंडित व्हावी यासाठी हे लॅाक डाऊन.प्रत्येक नागरिकांनी या काळात घरात थांबून देशाला सहकार्य करावे.असे आवाहन भारताच्या पंतप्रधानांनी केले.अर्थात ते प्रत्येकाच्या जिवित्वाच्या दृष्टीने फायद्याचे होते.जेव्हा जेव्हा देशावर संकटे येतात.तेव्हा देशातील अनेक माणसे पुढे येतात.स्वतःचे कुटुंब,कुटुंबातील सदस्य यांचा विचार न करता देशाच्या संकटाला हातभार लावण्यासाठी स्वतःची बाजी लावतात.यावेळेस सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या देशातील डॉक्टर्स,परिचारिका,वाॅर्ड बॉय,पॅथॉलॉजी डाॅक्टर,दवाखान्यातील सफाई कामगार, मेडिकल असोसिएशनचे कर्मचारी,पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी बांधव,मीडिया,पत्रकार,अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी,कामगार बांधव पुढे आलेले आहे.या संकटावर मात करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. यामध्ये स्वतःच्या जिवाचा कुठेही विचार नाही.त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाचा,कुटुंबातील सदस्यांचा आई-वडिल, पत्नी,मुले यांचा विचार न करता.देशातील प्रत्येक कुटुंबासाठी,प्रत्येक नागरिकासाठी 24 तास हे सर्वजण झटत आहे.कोरोना सारख्या विषाणूची लागण होऊ नये.म्हणून प्रत्येकाने स्वतःला घरातच बंद करून घ्यायचे आहे.असे आवाहन सरकार व प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.परंतु या संकटाला सामोरे जात असताना स्वतः मात्र काळजी घ्यायला पुरेसा वेळ त्यांना नाही.याच काळात लोकांच्या रक्षणासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिवस-रात्र उभे आहे.राज्यात संचारबंदी लागू केली असताना सुद्धा लोक काही काम नसताना घराच्या बाहेर पडत आहे. यावेळी पोलिस बांधवांनी त्यांना अडवले.त्यांची चौकशी केली.त्यांना समजावले तर अनेक माणसातील अविचारी राक्षस याच बांधवांना विरोध करत आहे.पोलिस बांधवांना शिवीगाळ,मारहाण करत आहे.हे अतिशय निंदनीय कृत्य आहे.अनेक डॉक्टर्स आपण चुकीचे समजतो.वेळप्रसंगी शिवीगाळ करतो.मारहाण करतो.पण हेच डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण मेडिकल स्टाफ आज अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंण दिवस झटत आहे.स्वतःच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे देशातील प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी दवाखाना व मेडिकल यंत्रणेतील सर्वजण अतोनात प्रयत्न करत आहे. याचबरोबर देशातील संपूर्ण घटना,प्रत्येक हालचाल,नविन सुचना, उपाययोजना आपल्याला घरी बसून कळाव्या यासाठी मीडिया कर्मचारी व पत्रकार बांधव कोरोनाचा धोका पत्करून देशातील प्रत्येक गल्लीबोळात उभे आहेत.व प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे.याचबरोबर सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक लागणाऱ्या गोष्टी किराणा, भाजीपाला,बँक,पेट्रोल पंप या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व बांधव कोरोनाचा धोका पत्करून हजर आहेत.आजच्या घडीला भारतातील सर्व मंदिर,मशिद, चर्च,गुरुद्वार,बौध्द विहार,देरासर आज बंद आहे.पण खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या संरक्षणासाठी मंदिर,मशिद, चर्च,गुरुद्वार,बौध्द विहार,देरासर यातील देव डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टाफ,पॅथॉलॉजी डाॅक्टर,पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार,मीडिया,दवाखान्यातील सफाई कामगार,अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी बांधव यांच्या रूपाने जनसामान्यांसाठी झटत आहे.याक्षणी देवळातील देवा पेक्षा या माणसातील खरा देव ओळखण्याची गरज आहे.म्हणून प्रत्येक भारतीयांनी या माणंसातील देवाला सहकार्य केले पाहिजे.यांच्याप्रती ऋण व्यक्त केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने स्वतःतील माणुसकी जागृत केली पाहिजे. माणुसकीचे दर्शन घडवण्याची ही वेळ आहे. देशातील प्रत्येक माणसाने जन माणसाप्रती माणुसकीची भावना जागवली तरच कोरोना सारख्या संकटातून भारत लवकर बाहेर पडेल.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

माणसाचा शत्रू '' व्यसन

      माणसाचा शत्रू '' व्यसन ''

भारत हा संस्कृती व परंपरेने नटलेला देश आहे.या देशाला संस्कृती व संस्काराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. या देशाला संत-महात्मे, समाजसुधारक,थोर विचारवंत, शास्त्रज्ञ,अशा सर्वांच्या विचारांची परंपरा लाभलेली आहे.या सर्वांच्या विचारांणवर आज प्रत्येक जण स्वतःला सुशिक्षित समजून घेत आहे. स्वतःच्या सुशिक्षित व उच्चशिक्षित अहंकाराला आधुनिक जगाच्या स्पर्धेत ढकलून देत आहे.या जीवघेण्या स्पर्धेत प्रत्येक जणाला यश मिळवायचे आहे. या स्पर्धेत अपयश पदरी पडले की,ते कुणालाच पचनी पडत नाही.मग हेच अपयश मणुष्याला निराशेच्या खाईत लोटून देते.पुढारलेल्या विचारसरणीला हे नैराश्यपूर्ण अपयश हळूहळू मनाला पोखरून लागते.अशा वेळी मनुष्य सहाजिकच व्यसनाकडे ओढला जातो. माणसाला वेगवेगळी व्यसन जडली जाते.तंबाखू,बिडी, सिगारेट,गुटका, दारू,गांजा,ड्रग्स,कोकेन आधी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं माणसाला जडते.मुळात व्यसन शोक किंवा ऐश्वर्य प्रगट करण्याचे साधन नाही.व्यसन मुळातच वाईट आहे.व्यसनामुळे अत्यंत घातकस्वरूपाचे दुष्परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. त्यातून आर्थिक,कौटुंबिक,मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचे दुष्परिणाम होत असतात.व्यसन करण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो.दिवसभरात कमावलेला पैसा व्यसनापायी खर्च होऊ लागला की,निश्चितच आर्थिक चुणचुण भासू लागते.यातूनच मग कुटुंब कलह सुरू होतो.नवरा बायकोचे भांडण,वडील मुलाचे भांडण, भावा-भावाचे भांडणे होतात.कुटुंबाचे आनंदी क्षण व्यसनापायी मावळायला लागतात.मनावरचा ताण कमी होईल म्हणून माणूस व्यसन करतो.मुळात घडते मात्र उलटेच,व्यसनामुळे मानसिक ताण तणाव अधिक वाढतो. माणसाचे मानसिक संतुलन बिघडते. व्यसनात तो काय करतो याचे त्याला भान राहत नाही.आईच्या गर्भातून मिळालेले सुंदर जीवनरूपी शरीर व्यसनामुळे खराब होते.लाखमोलाचे शरीर व शरीराचा एक-एक भाग व करोडोरुपये खर्च करून ही परत न मिळणारे आत्मारुपी देह रोगांना आमंत्रण देत असतो.व्यसनामुळे कॅन्सर,लिव्हरचे खराब होणे,पोटाचे आजार या सारख्या महाभयंकर रोगांना आमंत्रण दिले जाते.व्यसनाच्या धुंदीत मनुष्य या गोष्टीकडे लक्ष देत नाही.एक वेळ स्वतःचे शरीर रोगाच्या स्वाधीन करून.सर्वात शेवटी पश्चातापाचा जप करत बसतो.कारण व्यसनाचा शेवट हा आर्थिक,मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक पश्चातापाचा शिवाय त्याच्याकडे काही उरत नाही. मनुष्याने निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गा सारखे निर्मळ व स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे.आयुष्यात व्यसन करायचेच असेल तर चांगल्या गोष्टीचे केले पाहिजे.ज्यातून माणसाच्या आयुष्याला आनंदी व निरोगी बनवू शकेल.आयुष्यात व्यसन करायचे असेल तर राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊं आईसाहेबांच्या संस्काराचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचे,स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे,व संत गाडगे बाबांच्या स्वच्छतेचे केले पाहिजे.अशा व्यसनाने स्वतःला, कुटुंबाला,समाजाला,या महाराष्ट्राच्या मातीला व भारतभूमीला सुजलाम सुफलाम बनवूया.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मो.न 9823425852

निसर्ग संवर्धन काळाची गरज


 निसर्ग संवर्धन काळाची गरज

पृथ्वीवर सजीव आणि निर्जीव वास्तवात आहे.पूर्वीच्या काळापासून सजीव हे निसर्गावर अवलंबून आहे. सजीवातील सर्वात बुद्धिमान मानवजात तर निसर्गाच्या कुशीतच जन्म घेते.व निसर्गाच्या कुशीतच अंतिम श्वास सोडते.मानवाला अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा याच निसर्गातून मिळतात.मानव पूर्वी काळापासून आपल्या गरजा भागवत आहे.पुढे मात्र विज्ञानाने प्रगती केली. मानव शिक्षण घेऊन स्वतःला विद्वान समजू लागला.त्याने त्याच्या गरजाचा विस्तार वाढवला.स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो हळूहळू या निसर्गाच्या जीवावर उठला.निसर्गातल्या अनेक गोष्टीचा मर्यादेपेक्षा जास्त उपभोग घेऊ लागला.त्यामुळे निसर्गाची परिस्थिती बिघडली.अाजची परिस्थिती पाहता निसर्गाला दुष्परिणाम करणारे घटक प्रचंड प्रमाणात वाढत आहे.यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण,वाढते तापमान, पाणीटंचाई,औषधी वनस्पती नष्ट होणे, वाढती जंगलतोड,नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर या गोष्टीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.ह्या सर्व गोष्टी मानवाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.याचे परिणाम निश्चितच येणाऱ्या काळात मानवाला भोगावे लागेल.आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रगतीने माणूस फार अंहकारी झाला आहे.तो स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाच्या जीवावर उठलाय आहे.वाढते उद्योग धंदे, दळणवळणासाठी रस्ते, शहरीकरणामध्ये वाढत्या वसाहती यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे.झाडे लावणाऱ्या पेक्षा झाडे तोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज सरकारला झाडे लावण्याची सर्वसामान्यांमध्ये जागृती करावी लागत आहे.यापेक्षा दुर्दैवी गोष्टी दुसरी कोणती.दरवर्षी धो धो पडणारा पाऊस उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचे सावट बनतो.कारण पडणाऱ्या पावसाचे नियोजन होत नाही.पाणी आडवा पाणी जिरवा ही म्हण सगळे विसरून चालेले आहे.जो तो पाण्यासाठी पृथ्वीच्या पोटात नवीन छिद्र पाडण्यास दंग झाला आहे.ते थांबवायला मात्र कुणीही पुढे येत नाही.दरवर्षी तापमान नवीन उच्चांक गाठत आहे.या वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत चाललेले आहे.जंगलामध्ये आग लागत आहे.अनेक वृक्ष जळून खाक होत आहे.अनेक वृक्षांच्या जाती नष्ट होत आहे.असे म्हटले जाते की स्वतःवर बेतल्या शिवाय कोणत्याही गोष्टीचे महत्त्व कळत नाही.तसे निसर्गाचे कोपणे मानवाला कळायला वेळ लागणार नाही.वेळीच निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.दरवर्षी प्रत्येकाने नवीन झाडे लावली पाहिजे.वाढदिवस,आनंदाचे क्षण झाड लावुन साजरे केले पाहिजे. तो आनंदाचा क्षण झाडाच्या रूपाने टिकवून ठेवता येईल.नुसते झाडे लावून चालत नाही तर त्याचे संगोपन सुद्धा झाले पाहिजे.दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवले पाहिजे.जमिनीमध्ये जिरवले पाहिजे. यासाठी मोकळ्या जागेत खड्डे करून पाणी आडवा.हवेचे प्रदुषण होणाऱ्या साधनांचा अतिवापर वापर टाळावा.ही पृथ्वी,निसर्ग प्रत्येकाचा आहे.त्याचे संगोपन व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.हे वेळीच ओळखले पाहिजे.नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जपुन केला पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्ती दीर्घकाळ टिकली पाहिजे. निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे हे वेळीच ओळखून सर्वजण प्रयत्न करूया व निसर्गाचे सौंदर्य अबाधित राहू या.


✍✍✍✍✍
©राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


आई सुखाची जननी !


" आई सुखाची जननी "



 देवाला प्रत्येकाच्या घरी जन्म घेता येणे शक्य नाही. म्हणून देवाने आईची निर्मिती केली. आईचा रूपाने प्रत्येक घरात भगवंत अवतरत असतो. जगातील सर्वात सुंदर नात म्हणजे आई. नऊ महिने नऊ दिवस दगडाप्रमाणे पोटाशी ओझे वागवते. चेहऱ्यावर मात्र लाखमोलाचा आनंद झळकतो. स्वतःच्या इच्छा आकांक्षाला मारून, बाळाच्या वाढीसाठी लागणारे अन्न व औषधीचे सेवन करते. जगातल्या सर्वात सुंदर व सुरक्षित गर्भात आपल्या बाळाला वाढवते. नऊ महिने नऊ दिवस झाले की, आपल्या बाळाच्या जन्मासाठी असह्य वेदना सहन करते, ती फक्त आईच होय. स्वतःचे दुःख विसरुन बाळाला स्वतःच्या छातीशी कवटाळते. आपला सर्वात पहिला गुरु आई होते. आपल्यावर सर्वप्रथम चांगले संस्कार आई करते. बोलणे, चालणे, अशा प्रत्येक गोष्टी प्रथम आईच शिकवीते. स्वतःच्या पोटाला मारून लेकराच्या मुखात अन्नाचा घास भरवणारी आई प्रत्येकाला देवाने दिली. परिस्थिती कशीही असो त्याची खंत न करता आपल्या बाळाला सुरक्षित व सुखरूप ठेवते. जगातली प्रत्येक चांगली गोष्ट फक्त माझ्याच बाळाला मिळावी हा अट्टाहास सदैव करत राहते. सकाळी झोपेतून उठतांना तोंडावरून हात फिरविते. अंघोळ घालून स्वतःच्या पदराने ओले अंग पुसण्याचे भाग्य विध्यात्याने तिच्याच पदरी घातले. प्रेमाचा, मायेचा सागर म्हणजे आई. उन्हात सावली निर्माण करते ती आई. कडू घास तिच्या स्पर्शाने गोड लागतो ती आई. स्वतः आयुष्यभर दुःख सहन करून लेकराच्या आनंदासाठी, सुखासाठी झटत राहते ती फक्त आईच होय. आई म्हणजे वाळवंटाच्या उन्हातील पाण्याचा झरा, आई म्हणजे दुधावरची साय, आई म्हणजे देवळातील घंटेचा सुंदर नाद, आई म्हणजे भजनातील सुंदर रामनाम, आई म्हणजे प्रेमाचा अखंड झरा, आई म्हणजे वेदनेची फुकंर, आई म्हणजे संस्काराचा खजिना होय. जगात असे एकच नाते आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. उत्तम संस्कार व शिक्षण देऊन, आपल्याला उत्तम घडवण्याचे काम ती करत असते. सुंदर बालक घडवणारी ती एक उत्तम कलाकार असते. आई ही मुळात देवाचा अवतार आहे. प्रत्येकाला देवाने स्वतःचा अंश आई रूपाने दिला आहे. तो प्रत्येकाला आयुष्यात जपता आला पाहिजे. संस्कार व शिक्षणाने आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले. कितीही पैसा, प्रतिष्ठा प्राप्त केली. तरी आईपेक्षा मोठं कुणालाच होता येत नाही. ही वास्तव परिस्थिती आहे. आईला आपले लेकरू हे सर्व सुखापेक्षा मोठे वाटते. आयुष्यात त्यागाचे प्रतीक बनून ती लेकरासाठी सर्व गोष्टीचा त्याग करत आलेली असते. स्वतः दुःख सहन करून सुखाचा ओलावा निर्माण करण्याची शक्ती फक्त आईला जमते. रंग, रुप याचा मोह तिला नसतो. आपले बाळ कसेही असो. तिला स्वतःच्या जिवापेक्षा अधिक प्रिय असते. आपल्या बालकाला गरिबीची चाहूल लागू न देता. शक्य होईल तेवढे अधिक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न ती करत असते. प्रत्येक आई आपल्या मुलाला चांगले संस्कार, शिक्षण, उत्तम आरोग्य, प्रदान करत असते. आयुष्यात आपणही आईला देवाप्रमाणे जपले पाहिजे. आईचे ऋण एका जन्मात फेडणे शक्य नाही. पण आईला जीवापाड जपणे मात्र शक्य आहे. आयुष्यात आपल्याला यशाची भरारी घेण्यासाठी, आपल्या पंखामध्ये बळ भरण्याचे काम आईनेच केलेले असते. जीवनात यशाचे शिखर गाठल्यावर, त्याच शिखरावरून मागे वळून पाहताना आपली आई आपल्याला लहान दिसता कामा नये. तिचे महत्त्व त्या उंच यशाच्या शिखरा ऐवढेच मोठे आहे. तिचे स्थान कधीही कमी होत नाही. आईची किंमत आई गेल्यावरच कळते. जसा सुर्य मावळला की, त्याचा प्रखर प्रकाश नाहीसा होतो. सगळीकडे अंधाराचे वास्तव पसरते. तसे आई जीवनातून गेली की, जीवन अंधारमय होऊन जाते. आईच्या कुशीत मिळणारा विसावा जगाच्या कोणत्याच गादीत मिळत नाही. आईचा तोंडावरून फिरणाऱ्या हाताचे प्रेम जगाच्या कुठल्याच शक्तीत मिळत नाही. वात्सल्याचा हा झरा असाच सदैव प्रत्येकाला मिळत राहो. यासाठी आई हे दैवत मानुन सदैव तिला देवाप्रती पुजत रहावे.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

परतीच्या यातना

         परतीच्या यातना

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले.कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने संपुर्ण देशात लाॅकडाऊन एक,दोन व तीन असे टप्पे केले.या लाॅकडाऊन काळात गल्ली ते दिल्ली पर्यंत लोकांनी घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडित करायचीआहे. लाॅकडाऊनमुळे अनेक अडचणीचा सामना प्रत्येकाला करावा लागला. ग्रामीण भागातील अनेक मजूर कामाच्या शोधात शहरात येत असतात.मिळेल ते काम स्वीकारून,शहरातच स्थिरावतात.दोन पैसे कमावून आपला संसार भागवत असतात.या झगमगत्या सोनेरी शहरात स्वतःच्या परिस्थितीला घेऊन येत असतात.लाॅकडाऊनमुळे छोटे-मोठे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले. साहजिकच छोटे व्यवसायिक व मोठ्या उद्योगधंद्यातील मजूर यांच्या हातचे काम बंद झाले.कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना घरातच बसून ठेवले.सहाजिकच हाताला काम नाही.अर्थात काम नाही,म्हणजे पैसा येणे बंद झाले.यातच एसटी बस, रेल्वे सेवा बंद असल्यामुळे शहरातून स्वतःच्या गावी जाता येत नाही.देशात अनेक भागात मजूर अडकून पडले आहे. कोरोनाच्या या संकटात जगण्याची परीक्षा सुरू झाली.पुन्हा एकदा परिस्थितीने छळले.एक वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.गरिबाने दिवसभर काम केले.तर रात्री चुल पेटते.हि सत्य परिस्थिती मजुर वर्गाची आहे.देश बंद,काम बंद,पैसे मिळणे बंद,त्यामुळे पोटाला बंद ठेवण्याची वेळ आली.सरकार,सामाजिक संस्था,सेवाभावी लोक यांच्या कडून मिळालेल्या मदतीवर कसेबसे जगणे सुरू होते.यात कोरोनाचे संकट आजुबाजूला सावली सारखे छत धरुन उभेच होते.किती दिवस असे थांबणार या विचारात हे मजुर लोक होते.किमान स्वतःच्या गावी गेलो तर,कसेही करुन पोट भरेल.कोरोना पासुन वाचता येईल.या विचाराने अनेकांनी या लाॅकडाऊन काळात सरळ देशभर हजारो किलोमीटरचा पायी प्रवास सुरु केला.उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात दिवसभर पायपीट करत राहायचे. मिळेल ते अन्न खायचे.नाही मिळाले तर पाणी पोटात ढकलून पुढे चालत राहायचे.जेव्हा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो.तेव्हा मनुष्य हतबल होऊन जातो.त्याची इच्छाशक्ती त्याला जगवत असते.अनेक मजुरांनी "आम्ही जातो आमच्या गावा,आमचा रामराम घ्यावा" असे म्हणत शहराला रामराम ठोकला.अनेकांनी शेवटीआपले गाव गाठले. जीवनात अशी वेळ कधी येईल.असे स्वप्नात सुद्धा त्यांना वाटले नसेल.अनेकांना हाताला काम नाही.तशी पोटाला पोटभर अन्न नाही.सरकारी मिळेल ती मदत घ्यायची व काही दिवस पोटाची भूक भागवायची.लॉकडाऊन उठेल व हाताला काम मिळेल.या आशेपोटी एक एक दिवस मोजत लाॅकडाऊन संपायची वाट पाहात बसायचे. अशातच लाॅकडाऊन एक सुरू असतांना,देशाच्या पंतप्रधानांनी दुसरे 21 दिवसाचे लाॅकडाऊन घोषित केले.एका छोटाश्या प्रकाश किरणांना,एखाद्या घनदाट काळोखांनी गिळून टाकावे.तसे क्षणात आशेचे किरण नाहीसे होऊन गेले.पुन्हा 21 दिवसाच्या नजर लावून सगळे जण बसले.या एकदिवस दिवसात कोरोनाचा नायनाट होईल असे वाटत होते.पुन्हा एकदा कोरोनाने नशिबाची क्रूर थट्टा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला.नाईलाजास्तव तिसरे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले.फरक एकच झाला.अगोदरचे दोन लाॅकडाऊन ब्लॅकेन व्हाईट होते. तिसरे मात्र कलरफुल झाले.कोरोना रुग्ण संख्येवरुन रेड,ऑरेंज,ग्रिन अशा तीन प्रकारे जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली.या प्रकारावरून काही नियमात थोडेफार बदल करण्यात आले.मात्र सामान्य नागरिकांना गोरगरीब मजुरांना हे कलरफुल लॉकडाऊन अपयशीच ठरले.काही गोष्टी सुरु तर काही गोष्टी बंद.यामध्ये हाताला न कुठले काम मिळत आहे ना घराच्या बाहेर पडून कामाचा शोध घेता येत आहे.यावर्षी कोरोनामुळे अनेक गोष्टी बंद झाल्या आहे.यात लग्न समारंभ,मोठे-मोठे सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सामुहिक सण-उत्सव बंद करण्यात आलेले आहे.त्याबरोबरच कंपन्या, हॉटेल्स, मॉल्स,चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहे.अशा ठिकाणी हाताला मिळणारे काम सुद्धा बंद झाले.भलेही सरकारने कलर झोन नुसार काही बाबतीत सूट दिली.पण कोरोनाच्या भितीमुळे लोक आजही घराबाहेर पडायला घाबरत आहे.अनेक राज्य, देश आर्थिक संकटाच्या छायेत ढकलला जातोय.कधी काळी सोन्याचा धूर निघणारा हा देश आज मात्र कोरोनाच्या संकटापुढे हतबल झाला आहे. देशाला प्रतिष्ठा व पैशापेक्षा देशातील प्रजा महत्त्वाची आहे.आज अनेकांना वाचविण्यासाठी देशात सर्व यंत्रणा सज्ज आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने या संकटात योगदान देत आहे. कोरोनाने आज जगावर संकटाची वेळ आणली आहे.प्रत्येक देश या संकटातून बाहेर पडण्यासाठी झटत आहे.भारतासारखा सुजलाम सुफलाम देशही पूर्ण ताकदीने या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे.देशातील जनतेने सुद्धा या संकटात एकजुटीने देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.देश वाचला तर आपण वाचू,सामान्य जनता वाचली तर देश वाचेल.कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही.म्हणून वेळेचा सदुपयोग करुया.लाॅकडाऊनच्या काळात देवाला साकडे घालूया.की या संकटातून देशाला सुखरूप बाहेर सोडव. भारत या गरीब जनतेचा देश आहे.कष्टकरी शेतकऱ्याचा, घाम गाळणाऱ्या मजुराचा,नामस्मरण करणाऱ्या वारकर्‍याचा देश आहे.निश्चितच भारत हा पवित्र व भाग्यशाली,प्रयत्नवादी देश आहे.एक दिवस वाट चुकलेला कोरोना या देशातून निघून जाईल.आज आलेली वेळ निघून जाईल.गरज आहे ती नियमांच्या पालनाची व अनेक गोरगरीब लोकांना सहकार्याची.कोरोना बाधित रुग्णांना हिम्मत देण्याची ही वेळ आहे.वेळ,काळ कधीही कुणासाठी थांबत नाही.वेळ,काळाचे चक्र सदैव सुरू राहते.आज आलेली कोरोना व्हायरस संकटाची वेळ निघून जाईल.एक दिवस लाॅकडाऊनची सुद्धा वेळ संपेल.पुन्हा एकदा सगळीकडे जमेल गर्दी व माणसाला माणसाच्या माणुसकीच मिळेल साथ.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...