विश्वास हा विचारांचा धागा आहे. चांगले विचार मांडताना ते विश्वासाने आपण दुसऱ्या समोर मांडतो. ते विचार चांगले की वाईट याचा विचार न करता समोरची व्यक्ती ते आत्मसात करत असते. असाच विश्वास मनुष्य स्वतःच्या आत्म्याला देत असतो. मी करत असलेले काम प्रामाणिक आहे. माझे आचार, विचार हे सत्य आहे. न्यायनीती व धर्माला धरून आहे. हा विश्वास स्वतःच्या आत्म्याला दिला की, मनुष्य कोणतेही काम प्रभावी करू शकतो. स्वतःच्या जीवनात ज्ञान व क्षमता याला धरून मनुष्य काम निवडत असतो. मनुष्याला जीवन जगतांना कष्ट करावे लागते. स्वतःच्या गरजा स्वतःला भागवाव्या लागतात. जीवनात कोणतेही काम करताना ते आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे करावे. स्वतःमधील विश्वास हा कोणतेही कठीण कार्य सहज पूर्ण करू शकतो. व्यवहारात एकमेकांवर विश्वास ठेवूनच व्यवहार करावा लागतो. दुसऱ्याला दिलेला शब्द किंवा वचन म्हणजेच विश्वास होय. माणसाची नाती संबंध ही विश्वासाच्या धाग्यांवरच जोडलेली असते. नातेसंबंध, मैत्री, व्यवहार हे विश्वासावर चालत असते. प्रत्येकामध्ये आत्मविश्वास हा असतोच काहीजण तो ओळखतात तर काहीजण त्याला ओळखायला खूप अवधी लावतात. जे स्वतःमधील आत्मविश्वास ओळखतात ते निश्चितच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केल्याशिवाय राहत नाही. ते समाजासाठी प्रेरणादायी बनुन राहतात. मनुष्य हा सर्वगुणसंपन्न व बुद्धिमान आहे. तो कोणतेही कठीण कार्य सहज पूर्ण करू शकतो. ते स्वतःच्या आत्मविश्वासावर होय. प्रत्येकाने मी सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रामाणिक जीवन जगेल असा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत केला पाहिजे. वाईट व्यसन, वाईट प्रवृत्ती, वाईट संबंध त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. मनुष्यामध्ये अंहकारापेक्षा आत्मविश्वास अधिक असावा. आयुष्याचा प्रत्येक टप्पा सर करताना तो सहज व उत्तम करता आला पाहिजे. एवढा आत्मविश्वास मनी बाळगला पाहिजे. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी स्वतःचा विश्वास प्रखर असावा. स्वतःचे मन, भावना व विचार यांचे कार्य स्वतःमधील विश्वासावर चालत असते. जीवनातील सुख, दुःख, व संकटाचे प्रसंग याला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. फक्त ते शोधण्याचा विश्वास आपल्यात असला पाहिजे. स्वतःमध्ये सकारात्मक आत्मविश्वास असला की, कोणतेही कठीण कार्य सहज पुर्ण करता येते. देवाने प्रत्येकाला मन, भावना दिलेल्या आहेत. माणसाने फक्त स्वतःमधील आत्मविश्वास जागृत ठेवला पाहिजे.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment