हॅलो ....! मोबाईल बोलतोय. .
हॅलो…! मी मोबाईल बोलतोय…. मी आज तुम्हाला माझी ओळख करून देतो. मला सगळे जण ओळखतात. मला मराठीत भ्रमणध्वनी व इंग्रजीमध्ये मोबाईल फोन किंवा सेल फोन असे म्हणतात. माझा वापर संभाषणासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करतात. जगात सर्वप्रथम मला मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कपूर ह्या व्यक्तीने 1973 मध्ये विकसित केले. माझा वापर करून पाहिले गेले. हळू हळू माझी वाढ होत गेली. मी अनेकांच्या जवळ गेलो. माझी वाढ झपाट्याने होत गेली. आज विकसित देशांमध्ये 100 व्यक्तीपैकी 97 जणांकडे मी आहे. तर जगात 100 व्यक्तीपैकी 45 व्यक्तीजवळ मी आहे. भारतात सर्वप्रथम माझा वापर करून 1995 मध्ये संभाषण साधण्यात आले. सुरुवातीला शहरी भागातच माझे वास्तव्य होते. हळूहळू शहरी-ग्रामीण सर्व ठिकाणी मी वास्तवात आलो. अगोदर माझा वापर फक्त बोलण्यासाठी व्हायचा. मी अगदी लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचो. माझा वापर होत असतानाच माझ्यात काही बदल केले गेले. मी संभाषण साधण्याबरोबरच गाणे ऐकण्यासाठी कामी येऊ लागलो. माझ्या मध्ये मेमरी कार्ड च्या रूपाने ऑडिओ गाणी भरून माझ्यात साठवले जाऊ लागले. वाटेल तेव्हा, वाटेल त्या ठिकाणी गाणी वाजवली जाऊ लागली. माझ्यामुळे अनेकांना जुनी-नवी मराठी, हिंदी गाणी ऐकायला मिळू लागली. तेवढ्यावर न थांबता मानवाने माझी आणखी प्रगती करायचे ठरवले. मोठी स्क्रिन, कॅमेरा, ऑडिओ बरोबरच व्हिडिओ पाहण्याची सुविधा निर्माण करून मला नवीन रुपात प्रगट केले. यामुळे अनेक जण माझा वापर फोटो काढण्यासाठी करू लागला. माझ्यामुळे मी अनेकांना फोटोच्या रूपाने एकत्र करू लागलो. छोटी छोटी गाणी ऐकण्या बरोबरच आता दिसू लागली होती. मोठ्या मोठ्या कॅमेर्याची जागा आता मी घेतली होती.वेगवेगळ्या समारंभात, वेगवेगळ्या आनंदाच्या क्षणी वाटेल तेव्हा माझ्यामुळे मी अनेक क्षण टिपू लागलो. याबरोबरच टेक्स मेसेजच्या रूपाने शुभ सकाळ, शुभ रात्री, वाढदिवसाच्या शुभेच्छा, अभिनंदनाचे मेसेज दुसऱ्या पर्यंत जाऊ लागले. दिवसभरात न भेटलेल्या माणसाला मेसेज च्या रूपाने शुभेच्छा मिळू लागल्या. गाणी, फोटो, मेसेज असा वापर होऊ लागला. पण माणूस एवढ्यावरच समाधानी नव्हता. त्यांने त्याच्या शोध वृत्तीनुसार माझ्यात पुन्हा बदल करावयाचे ठरवले. मला आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये जोडायचे ठरवले. सिम कार्ड व मेमरी कार्ड याबरोबरच इंटरनेट जोडायचे ठरविले. मला नवीन रुपात अँड्रॉइड मोबाईल म्हणून लोकांसमोर आणले गेले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या व विज्ञानाच्या युगात मी अत्याधुनिक सुविधेसह सर्वांसमोर नवीन रुपात प्रकट झालो. या नवीन रूपात बटणाच्या जागी स्क्रीन टच पॅड आला. मोठा आधुनिक कॅमेरा, टीव्ही, व्हिडिओ, संगणका प्रमाणे लिहिण्यासाठी कीपॅड, गेम्स अशा अनेक ॲप्ससह माझी निर्मिती झाली.या बदलांमध्ये माझी साठवण क्षमता वाढविण्यात आली होती. मी आकाराने व क्षमतेने सुद्धा मोठा झालो होतो. आता मी आधुनिक तंत्रज्ञानाचा शक्तिशाली इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये प्रिय असा झालो. या बदलानुसार माझ्यात अनेक नविन गोष्टी जोडल्या गेल्या. ह्या गोष्टी मानवांना एकमेकांशी जोडत गेल्या. यामध्ये व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या नवीन गोष्टी माझ्यात निर्माण करण्यात आल्या आहे. या माध्यमातून जग एकमेकांशी जोडल्या गेले. अगदी जवळ आले. या माध्यमाचा वापर करताना मी प्रचंड लोकप्रिय झालो. फोटो, गाणी, व्हिडिओ, लेखन साहित्य आदी सर्व गोष्टींची देवाणघेवाण सुरू झाली. ज्ञान व माहितीची देवाणघेवाण या गोष्टींसाठी आता वापर होऊ लागला. चालता-फिरता ज्ञानाचा खजिना म्हणून मला सोबत घेऊन फिरणे सहज शक्य होते. त्यामुळे मी लोकांना हवाहवासा वाटू लागलो. प्रत्येकाजवळ माझा वापर वाढला. अगदी तरुणांनी मला खूप लोकप्रिय केले. आज लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत माझा वापर सर्वजण करतात. मी अगदी सगळ्यांना माझ्यात खूप गुंतून ठेवतो. मी एका टचवर जगातील माहिती देतो. संभाषण, माहितीची देवाण-घेवाण याबरोबरच ज्ञान मिळवण्यासाठी माझा वापर होत आहे. इंटरनेट जोडणीमुळे मी जगातील कोणतीही माहिती लवकर, अचूक देण्याचा प्रयत्न करतो. माझा ऑनलाईन वापर करून अनेक महत्त्वाची कामे आज केली जात आहे. माझा होत असलेला वापर व मानवाच्या हितासाठी मी उपयोगी येतो. याचा मला आनंद आहे. पण कधीकधी अनेक जण माझा चुकीचा वापर करतात. त्यामुळे मी फार दुःखी होतो. अनेकजण माझा वापर चुकीच्या कामासाठी करतात. अनेकांची चुकीची फोटो काढणे, बँकेचे पैसे चोरण्यासाठी माझी मदत घेणे, महत्वाच्या फाईलची चोरी करणे, चुकीची माहिती व्हायरल करणे, याबरोबरच जातीय तेढ निर्माण करणे. धर्माधर्मात चुकीची माहिती पसरविणे. असे प्रकार माझ्या माध्यमातून केले जातात. मला बदनाम केले जाते. याबरोबरच लहान मुलं गेम्सच्या माध्यमातून माझा अति वापर करतात. मैदानावर खेळली जाणारी खेळ, अंगणात खेळले जाणारे खेळ, घरामध्ये खेळले जाणारे खेळ हे सर्व माझ्यात साठवले असल्यामुळे ही सर्व खेळ आता माझ्यातच खेळली जातात. मुले आधुनिक खेळाच्या मोहात पडुन त्याचा अतिवापर करतात. या आधुनिक खेळामुळे अनेक जण आत्महत्या करतात. माझ्यासाठी पालकाकडे अट्टाहास करतात. घरच्यांनी मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. तर आत्महत्या करतात. माझ्यामुळे जेव्हा लोकांचा जीव जातो. त्यावेळी मी फार व्यथित होतो. माझ्यासाठी कोणी जीव गमावला तर मला दुःख होते. मला फार वाईट वाटते. मी मुळात चांगलाच आहे. माझा चांगला वापर करून अनेक फायदे मानवाने करून घ्यावे. माझा चुकीचा वापर, अति वापर करू नये. अनेक जण माझा अति वापर करतात. यामुळे येणाऱ्या काळात त्याचे परिणाम मानवाला भोगावे लागतील. मोबाईलवर जास्त बोलणे, मोबाईलवर जास्त वेळ काम करणे, मोबाईलचा अतिवापर यामुळे येणाऱ्या काळात दुष्परिणाम होऊ शकतात. डोळे, कान यांची क्षमता कमी होणे, या बरोबरच मुले एकलकोंडी, स्वमग्न होण्याची भीती आहे. म्हणून माझा योग्य तेवढाच वापर करा. मला लहान मुलांच्या हाती फारसे देऊ नका. मी जेवढा चांगला आहे. तेवढाच वाईट सुद्धा आहे. माझा वापर सर्वांनी समजून उमजून व परिणामाचा विचार करून करावा. माझ्या अतिवापरामुळे मी नष्ट होऊ नये. मी या एकविसाव्या शतकात टिकलो पाहिजे. मानवासाठी मी फायद्याचा ठरावा असे मला वाटते. चला काही दिवसांनी पुन्हा आधुनिक बदलाने मी तुमच्या सेवेत हजर होईल. तुम्ही पुन्हा एकदा माझा आनंदाने स्विकार कराल असी मी अपेक्षा करतो.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment