मानवी जीवन
जीवन हे अतिशय सुंदर आहे. देवा कडून मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा मानवी देह होय. मानवी देहाला सुंदरपणे जगता आले पाहिजे तरच जीवनाचे सार्थक होईल. या पृथ्वीतलावर लाखो प्रकारचे जीव-जंतू जन्म घेतात. काही वेळाने काही काळाने नष्ट होतात. इतिहास मात्र त्यांची दखल घेत नाही. या पृथ्वीतलावरील मोजकेच जीवजंतू जगण्याचा संघर्ष करतात. स्वतःच्या कर्तुत्वाने, संघर्षाने इतिहासाला, काळाला त्यांची दखल घ्यायला लावतात. या जीवजंतू प्रमाणे या पृथ्वीवर मानवरूपी देह धारण करणारा मनुष्य जन्माला येतो. स्वतःच्या जगण्यासाठी संघर्ष करतो, चांगले कर्म करतो, स्वकर्माने स्वतःची ओळख निर्माण करतो. एक दिवस मनुष्य देहाला सोडून जातो. परंतु आठवणींच्या रुपाने, कर्तुत्वाने, चांगल्या कर्माने स्वतःची ओळख माघे सोडून जातो. आयुष्यात जीवन जगतांना असे जगा की, काळ वेळ याला तुमचा हेवा वाटावा. अध्यात्मानुसार असे म्हणतात चौऱ्यांशी लक्ष योनीचा फेरा चुकवुन मानवी जीवन प्राप्त होते. या दीर्घ काळानंतर मिळालेले हे जीवन चांगले जगता आले पाहिजे. चांगले जीवन जगण्यासाठी चांगले कर्तव्य, चांगली कर्म करत राहिले पाहिजे. ज्ञानमार्ग, भक्तिमार्गाची संगत आयुष्यात असावी तरच मनुष्य योग्य रस्त्यावर चालत राहतो. या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःच्या जगण्यात आयुष्य घालवत असतो. मनुष्य योनीत मात्र संत-महात्मे, तपस्वी, योगी, समाजसुधारक, विचारवंत यांनी स्वतःचे जीवन जगण्या बरोबरच दुसऱ्यांना सुद्धा जीवन कसे जगायचे याचे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. संत महात्म्यांनी भक्तीचा मार्ग सांगितला, तपस्वी योगी यांनी ज्ञान व शांतीचा मार्ग सांगितला, तर समाज सुधारकांनी शिक्षणाचा मार्ग, विचारवंतांनी सुंदर विचारांचा मार्ग सांगितला आहे. जीवनात यापैकी कोणत्याही मार्गाची निवड केली व त्या योग्य मार्गानुसार जीवन जगत राहिले तर मनुष्यजन्माचे सार्थक होते. भक्ती, ज्ञान, शिक्षण व सुंदर विचार हे जीवन घडवण्यासाठी योग्य मार्ग आहे. या मार्गावर मनुष्य चालत राहिला तर स्व कर्तृत्वाने, स्व कर्माने तो निश्चितच स्वतःची ओळख निर्माण केल्याशिवाय राहत नाही. या पृथ्वीवर या मार्गाचा ज्यांनी ज्यांनी अवलंब केला आज त्यांची ओळख इतरांना जगण्यासाठी प्रेरणा बनून आहे. आजच्या कलियुगातील मनुष्य तर अहंकार, गर्व, स्वार्थ, लोभीपणा, व्यसन, आळस यासारख्या अनेक गोष्टींनी ग्रासलेला आहे. सुंदर आयुष्य जगतांना मात्र त्याला लागलेल्या या व्याधींनी तो स्वतःचे आयुष्य खराब करत आहे. अगदी तरुण पिढी सुद्धा अतिशय घातक स्वरूपाचे आयुष्य जगत आहे. आज-काल तरुण पिढी जीवन जगतांना त्याच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेली आहे. तो चुकीच्या मार्गाने जीवन जगतोय पण हे त्याच्या लक्षात येत नाही. व्यसन, चुकीची संगत, सुशिक्षित बेरोजगारी, यामुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे. याकडे समाज, पालक यांचे लक्ष नाही. आपली मुले आधुनिक जगाच्या स्पर्धेत किती वाहवली जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर त्यांचे जीवन बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज-काल जीवन जगतांना तरुण पिढी असेल म्हातारी माणसं असेल यांनी योग्य सहवास, योग्य संवाद, चांगला आहार, चांगले आचार विचार या गोष्टींचा अवलंब केला तरच आयुष्य सुंदर होईल. मनुष्य म्हणून जगतांना आनंद व निखळ सुख प्राप्त होईल. येणारा काळ आपल्या जगण्याची निश्चितच दखल घेईल. जीवन असे जगावे की किमान आपल्या सहवासातील चार माणसांनी, कुटुंबांने, समाजाने आपली दखल घेतली पाहिजे. आपल्या जगण्याने चार लोकांना प्रेरणा मिळावी तरच मनुष्य योनीत जन्माला येऊन फायदा झाला असे म्हणता येईल. नाहीतर इतर जीव-जंतु प्रमाणे आपण कधी जन्माला आलो व कधी मरण पावलो याची दखल कोणीच घेणार नाही.
‘‘ या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ’’.
‘‘ या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ’’.
प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर यांच्या या दोन ओळी जगण्याला सदैव प्रेरणा देतात. त्याप्रमाणे फक्त प्रत्येकाने मानवी जन्मावर प्रेम करत राहिले पाहिजे.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment